दाभोलकर हत्येच्या तपासात राजकारण नको

दाभोलकर हत्येच्या तपासात राजकारण नको

ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात होता. हे त्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या वक्तव्यातून समोर येत होते. मात्र, शासनाला कारवाईसाठी ठोस पुरावा मिळत नव्हता. दरम्यानच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या हत्याप्रकरणातील संशयितांना शासनाने शोधावे म्हणून जी आंदोलनाची धग कायम ठेवली. त्या दबावामुळे सरकारला या प्रकरणातील संशयितांचा सुगावा लावावा लागला. इतर राज्यांतील पुरोगामी विचारवंत गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणात सनातन संस्था असल्याचे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणातील पाळेमुळे केंद्र सरकार आणि राज्य शासनाने शोधून काढावीत, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केले.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, दाभोलकर, लंकेश, कलबुर्गी या पुरोगामी विचारवंताना जातीवाद्यांनी ठार केले आहे. मात्र, या विचारवंतांच्या हत्या या पुरोगामी विचारांच्या चळवळीसाठी हुतात्म्य आहे. त्यामुळे सनातनसारख्या संस्थांनी पुरोगामी विचारांना संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते संपणार नाही. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर शासनाकडून सनातन संस्थेवर कारवाई होत असल्याचा एक चांगला संदेश समाजात जात आहे. ही भाजपसाठीही चांगली बाब असल्याचे पाटकर म्हणाल्या. विचारवंताच्या हत्या जातीवाद्यांनी केल्या तरीही त्यांचे विचार संपणार नाहीत, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

First Published on: July 1, 2019 11:21 PM
Exit mobile version