दुकाने बंद करण्यासाठी दादागिरी चालणार नाही : छगन भुजबळ

दुकाने बंद करण्यासाठी दादागिरी चालणार नाही : छगन भुजबळ

राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण राज्यासाठी हा निर्णय असून केवळ एका जिल्हयासाठी वेगळा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन करण्याबाबत आमच्याकडून कोणतेही आदेश देण्यात येणार नाही.व्यापारी संघटनांना जर बंद पाळायचा असेल तर त्यांनी संघटनास्तरावर याबाबत निर्णय घ्यावा मात्र असा निर्णय घेतांना अत्यावश्यक सेवांवर परिणाम होता कामा नये. तसेच बंदबाबत कोणालाही जबरदस्ती करता येणार नाही ही लढाई करोनाशी आहे यात राजकारण न आणता बंद करण्यासाठी दादागिरी करू नये असा सूचक इशाराही जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

नाशिक शहरातील वाढती करोना बाधित रूग्णसंख्या पाहता शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांची वेळ मागितली होती. त्यानूसार शुक्रवारी शासकिय विश्रामगृह येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिकेचे सहा.आयुक्त प्रवीण आष्टीकर, महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा आदिंसह व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर बोलतांना भूजबळ म्हणाले की, या बैठकीत महाराष्ट्र चेंबर्सने काही मागण्या केल्या यात सम विषम तारखेनूसार दुकाने सुरू न ठेवता दररोज दोन्ही बाजूकडील दुकाने उघडी ठेवावीत, तसेच दुकानांच्या वेळा या सकाळी १० ते ५ पर्यंत करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. याबाबत मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली असता पुण्यामध्ये हा प्रयोग बंद करण्यात आल्यानंतर बाजारपेठेत मोठया प्रमाणावर गर्दी उसळली त्यामुळे याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल. तसेच वेळेबाबत केंद्राकडूनच निर्देश प्राप्त झाले आहेत त्यामुळे यात बदल करता येणे शक्य नाही.

व्यापारी संघटनांनी आपापल्या स्तरावरच निर्णय घेण्याचे त्यांनी सूचित केले. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत शासन पातळीवरून कोणतेही निर्देश दिले जाणार नाहीत असे भुजबळांनी स्पष्ट केले. करोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वी तीन महीने लॉकडाऊन करणे गरजेचे होते. मात्र आता लोकांच्या हातात पैसा शिल्लक राहीलेला नाही. अर्थचक्र ठप्प झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मिशन बीगीन अगेन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू करण्यासाठी पाउले उचलली आहेत. त्यादृष्टीने उद्योगधंदे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही सोडवावा लागेल. त्यामुळे एका भागात बंद केला म्हणजे दुसर्‍या भागात बंद केला पाहीजे ही चढाओढ करता काम नये. मग दुकानेच बंद का करायचे ?उद्योग, कारखाने, ऑफिस बंद का करू नये ? केवळ एकावर अन्याय करता येणार नाही. ज्यांना बंद ठेवायचे त्यांनी बंद ठेवावे मात्र अत्यावश्यक सेवा बाधित होउन नागरिकांना त्रास होता कामा नये असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. जनतेनेही स्वयंशिस्त पाळावी असे आवाहनही त्यांनी केले.

… तर मोदींना सांगा

भाजप आमदारांनी लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, सध्या संपुर्ण देश, राज्य करोना महामारीशी मुकाबला करत आहे. तीन महीने लॉकडाऊनमुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या हातात पैसा राहीलेला नाही सरकारला याचाही विचार करावा लागेल. राज्य सरकारला काही निर्णय केंद्राच्या गाइडलाईन नूसार घ्यावे लागतात. दुकानांच्या वेळेबाबतही केंद्राच्या गाइडलाइननूसारच निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी करणारयांनी पंतप्रधानांकडे मागणी करून संपूर्ण भारतच बंद करावा आमची काही हरकत नाही असा टोलाही त्यांनी भाजप आमदारांना लगावला.

काय म्हणाले भुजबळ

*आता कोणताही बंद करणार नाही.
* विरोधकांना जर बंद हवा असेल तर मोदींना सांगा, संगळा देश बंद करा.
* कोणी दादागिरी करून बंद केलेला चालणार नाही.
* मालेगावात पॉवरलूम सुरू केल्याने दोन लाख लोकांना रोजगार.
* ज्यांना पाच वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवायचे असतील तर ठेवावे.
* जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवावी लागतील.
* जगात इंधन दर कमी होताहेत भारतात वाढताहेत हे आश्चर्यकारकच.
* पडळकर यांची शरद पवारांवर टिका म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे.
* निदान आपला वकुब पाहून टिका करावी.

First Published on: June 26, 2020 2:07 PM
Exit mobile version