चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंची कार मरणपंथाला, गॅरेजमध्ये धूळ खात

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंची कार मरणपंथाला, गॅरेजमध्ये धूळ खात

दादासाहेब फाळके यांनी वापरलेल्या कारची दुरवस्था २०१२ नंतर आजही कायम आहे.

नाशिक ही दादासाहेबांची जन्मभूमी व कर्मभूमी असून, येथील त्यांचे राहते घर, जुना स्टुडिओ, फिल्म प्रोसेस लॅब व १९३४ मधील त्यांची मॉरीस गाडी, हे सर्व म्हणजे त्यांची आठवण आहे. नाशिकमध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या २९ एकर जागेवरील यापूर्वी असलेले महानगरपालिकेचे दादासाहेब फाळके स्मारकच राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. परंतु कालानुरुप ही मागणीही विरत गेली. राष्ट्रीय स्मारकाचा मुद्दा उपस्थित होताच २०१२ मध्ये दादासाहेबांच्या एक-एक वस्तू उजेडात आल्यात. त्यात मॉरिस कारचाही समावेश होता. या गाडीच्या देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल, गाडीला स्मारकात ठेवले जाईल, असे आश्वासन तत्कालीन आमदार वसंत गिते यांच्यासह अनेकांनी दिले होते. प्रत्यक्षात तिच्याकडे कोणी लक्षच दिले नसल्याची विदारक बाब पुढे आली आहे.

असा आहे दादासाहेबांच्या कारचा इतिहास

दादासाहेबांकडे असलेली मॉरिस गाडी त्यांच्याच ग्रुपमध्ये काम करणारे दादा भट यांना सुपूर्द करण्यात आली होती. दादा भटांनी लक्ष्मीबाई भट यांच्या नावावर ती गाडी घेतली होती. पुढे त्यांचा मुलगा शशिकांत यांच्याकडे ती गाडी कित्येक दिवस होती. त्या काळात शशिकांत यांच्या शेजारी राहणारे उदयकला ब्रासबॅण्डचे संचालक विजय तापकिरे यांनी शशिकांत यांना गळ घालून ही गाडी लग्नात नवरदेवाच्या वरातीसाठी वापरण्यास सुरुवात केली. पुढे अनेक वर्षांनी दुरुस्तीसाठी म्हणून ही गाडी शालिमार येथील होशी पटेल यांच्या गॅरेजमध्ये आणण्यात आली. त्यानंतर अनेक दिवस ती तेथेच पडून होती. तापकिरे यांचे मित्र प्रवीण चांदोडकर यांनी ही गाडी चांगल्या ठिकाणी दुरुस्तीला देण्यासाठी हट्ट केल्यानंतर ती गाडी वडाळानाका येथील गॅरेजमध्ये आणण्यात आली. तेव्हापासून ती तेथेच आहे.

पुरातन वास्तू संग्रहालय संचालक म्हणतात, हा विषय आमच्या अखत्यारितच नाही

या विषयी पुरातन वास्तू संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांना संपर्क साधला असता अशा कोणत्याही गाडीचा प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरातन वाहने आणि तत्सम बाबींचे संवर्धन हा विषय आमच्या खात्याच्या अखत्यारित नसून अन्यत्र याविषयी चौकशी करावी असेही ते ‘आपलं महानगर’ला म्हणाले. मात्र, कोणत्या खात्याशी संबंधित हा विषय आहे असे विचारले असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता दर्शविली.

दादासाहेब फाळके यांच्या कारची सद्यस्थिती
First Published on: January 30, 2019 1:18 PM
Exit mobile version