सिन्नर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ, लाखोंचा ऐवज लुटला

सिन्नर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ, लाखोंचा ऐवज लुटला

नाशिक – हत्येच्या घटना आणि गुन्हेगारीने शहरात अशांतता निर्माण झाली असतानाच आता सिन्नर तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत ६ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. दिसेल त्याला प्रचंड मारहाण करत या दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरचं सोनं ओरबाडत पळ काढला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करत त्यातल्या एकाला बांधून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिलं.

सिन्नर तालुक्यातल्या मलढोण शिवारात ही घटना घडली. सुमारे १० ते १२ दरोडेखोरांच्या टोळीने गुरुवारी (दि.२४) पहाटे सरोदे वस्तीवर धुडगूस घातला. समृद्धी महामार्गाजवळील सरोदे वस्तीवर वाल्मिक सरोदे चार मुलांसह राहतात. सरोदे यांच्या पत्नी विमलबाई, आई रखमाबाई आणि नातू संकेत हे सर्व बाहेर ओट्यावर झोपलेले होते. रात्री २ वाजेदरम्यान १० ते १२ दरोडेखोर मोटरसायकल्सवरुन आले आणि त्यांनी ओट्यावर झोपलेल्या चौघांवर हल्ला केला. बेदम मारहाणीमुळे प्रचंड आक्रोश सुरू होता. हा आवाज ऐकताच शेजारच्या खोलीत झोपलेला सरोदे यांचा मुलगा योगेश व पत्नी धावून आली. दरोडेखोरांनी वाल्मिक यांना गजाने हल्ला केला, तसेच डोक्यात बाटलीही फोडली. हा हल्ला सुरू असताना अन्य दरोडेखोर दगडफेक करत घरात शिरले. घरातील महिलांचा गळा आवळत अंगावरचं सोनं ओरबाडून घेतलं. घरात ठेवलंले पैसे व सोनंही लुटलं.

दरोडेखोरांच्या हल्ल्यामुळे सुरू असलेला प्रचंड आक्रोश, आरडाओरड ऐकून वस्तीवरचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक येत असल्याचं पाहताच दरोडेखोरांनी एकमेकांना आवाज देत पळ काढला. याचवेळी वाल्मिक यांच्या दोन्हीही मुलांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. सोबत इतर नागरिकही होते. मोटरसायकलवरुन फरार होत असलेल्या दरोडेखोरांपैकी एकाला मुलांनी ताब्यात घेतलं. दरोडेखोर आणि दोन्ही मुलांमध्ये हाणामारी झाली. नागरिक या घटनेमुळे प्रचंड संतापलेले होते. त्यामुळे त्यांनीही या दरोडेखोराला चांगलाच चोप दिला. यानंतर त्याला बांधून ठेवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दरोडेखोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

दरोडेखोर अहमदनगर जिल्ह्यातील

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अटक केलेल्या दरोडेखोराचं नाव ऋषिकेश विजय राठोड असून, पोलीसी हिसका दाखवल्यानंतर त्याने इतर दरोडेखोरांची नावं सांगितली. राठोड हा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रुई गावातील रहिवाशी आहे.

First Published on: November 25, 2021 12:29 PM
Exit mobile version