देवळाली कॅन्टोन्मेंट राज्यात प्रथम, तर देशभरातुन ४ थे

देवळाली कॅन्टोन्मेंट राज्यात प्रथम, तर देशभरातुन ४ थे

नाशिकरोड/भगूर : शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणावर दिलेला भर, आरोग्य कर्मचार्‍यांनी कोरोना काळातही झोकून केलेल्या कार्याची पावती म्हणून स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने देशभरातील ६४ कॅन्टोन्मेंट बोर्डामधून ४ थे, तर राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.

स्वच्छ देवळाली-सुंदर देवळाली, हरित देवळाली असे ब्रीद असणार्‍या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गेल्या दोन वर्षात सर्वेक्षणात ५२ व ३९ व्या स्थानावर घसरण झाली होती. ही उणीव भरून काढण्यासाठी मागील वर्षांपासून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार व विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू झाले. आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कामाचे केलेले नियोजन, वेळोवेळी राबविलेल्या स्वच्छता मोहीमा, आठही वार्डांमध्ये घंटागाड्यांचे अचूक नियोजन प्रभावी ठरले.

शहरातील ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेला सीएसटीपी प्लांट, शहरातील सौंदर्यीकरणसाठी केली जाणारी कलात्मकता, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचर्‍याचे योग्य नियोजन या बाबीदेखील महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोग्य कर्मचार्‍यांना कामाबाबत सतत मार्गदर्शन केल्याने गेल्या दोन वर्षात झालेली घसरण थांबली आणि देवळाली कॅन्टोन्मेंटचे नाव थेट पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पोहोचले. या कामगिरीसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, शाजेब सय्यद यांना केलेले मार्गदर्शन आणि शासकीय कंत्राटदार एन.एच.पटेल यांचे सुपरवायझर व कामगारांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न फलदायी ठरले. या सर्व प्रयत्नांना स्थानिकांचे मोठे सहकार्य लाभले, त्यामुळे हे यश मिळाल्याचे गुप्ता यांनी सांगितले.या सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने ३१८५ गुण मिळवत, राज्यात प्रथम तर देशात चौथे स्थान पटकावले आहे.

अधिकार्‍यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही केलेले नियोजन या यशासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरले.विशेष म्हणजे प्रत्यक्ष सफाई करणारे व घंटागाडी कर्मचारी यांनी प्रामाणिक सेवा दिली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सर्व माजी उपाध्यक्ष, लोकप्रतिनिधी सफाई कामगार यांच्या सहकार्यामुळे एवढी मजल मारता आली.
                     – एन. एच. पटेल, शासकीय कंत्राटदार, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड

First Published on: November 22, 2021 4:12 PM
Exit mobile version