उपमुख्यमंत्री गुरुवारी नाशिक दौर्‍यावर

उपमुख्यमंत्री गुरुवारी नाशिक दौर्‍यावर

राज्य पर्यटन विकासासाठी २५० कोटीं निधी वितरणाचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी (दि. १) नाशिक दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याचा कोरोना आढावा तसेच खरीप हंगाम बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त अजित पवार हे नाशिक दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी जिल्ह्याचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नाशिक जिल्हा हा हॉटस्पॉट ठरला. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी राज्यात डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका तसेच संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत यावेळी आढावा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम नियोजन व कर्ज वाटपाबाबतही ते आढावा घेणार आहेत. जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांना कर्ज मिळत नसल्याबाबत शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. तर बँकेकडून सक्तीची कर्जवसुली करण्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनींचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत.
याविरोधात भाजपसह किसान मोर्चा, रयत क्रांती संघटनेच्या वतीने नुकतेच जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेपोटी जिल्हा बँकेला ९२० कोटी रुपये मिळाले. त्यातील फक्त २३१.५१ कोटी पीककर्ज वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच मुंबईत बैठक घेण्यात आली होती. आता पुन्हा नाशिक दौर्‍यात पवार याबाबतचा आढावा घेणार असल्याचे समजते.

First Published on: June 30, 2021 12:10 PM
Exit mobile version