कपिलधारा तिर्थ : निधी मिळाला, मात्र वनवास कायम

कपिलधारा तिर्थ : निधी मिळाला, मात्र वनवास कायम

इगतपुरी : मागील सिंहस्थाच्या वेळी त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे भरीव विकासकामे झाली. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ स्थान समजल्या जाणार्‍या इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथील कपिलधारा तीर्थ मात्र विकासापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे आता या तीर्थाला परत सिंहस्थमेळा कधी येतो याची वाट बघावी लागत आहे. यामुळे साधू, संत, भाविक व जनतेत कमालीची नाराजी पसरली आहे. सन २०१५ साली या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर या ठिकाणी कुठलीही विकासकामे झाले नाही. माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी २०१५ मध्ये पर्यटन निधीतून गोशाळा, भक्त निवास, संत निवास, स्वयंपाक गृह इमारतीच्या कामासह शाहीस्नानासाठी मोठे तीर्थकुंडाचे काम मंजूर केले. मात्र, संबंधित ठेकेदाराने सर्वच निकृष्ट कामे केल्याचे उघड झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

शाही स्नानासाठी बांधण्यात आलेलल्या तीर्थकुंडाला गळती लागली आहे. विशेष म्हणजे साधू निवास, संत निवास, स्वयंपाक गृह, गोशाळा आदी इमारतीचे काम अर्धवट करून मध्यावरच सोडून देण्यात आले आहे. यासह अंर्तगत रस्ते अशी अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असून कामाची बिले मात्र पूर्णपणे काढून घेत शासनाची फसवणूक केली अशी माहिती शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा कपिलधारा तीर्थाचे विश्वस्थ कुलदीप चौधरी यांनी दिली. याबाबत शासन व प्रशासनाने दखल घ्यावी तसेच तीर्थ क्षेत्राचे अर्धवट काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करून काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी येथील संत-महंत यांसह भाविकांनी केली आहे.

श्रीक्षेत्र कपिल धारातीर्थ क्षेत्राला अत्यंत पुरातन, सनातन, धार्मिक व ऐतिहासिक वारसा असलेले प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. सिंहस्थाचे मूळ स्थान म्हणून या तीर्थक्षेत्राकडे पहिले जात असून तसा उल्लेखही प्राचीन ग्रंथामध्ये आढळून येतो. मात्र, सध्या शासन व प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या नियोजनात साधा उल्लेखही श्री क्षेत्र कावनईबाबत होत नसुन ही खेदाची बाब आहे. गतवेळेच्या सिंहस्थात शाही स्नानावेळी १० ते १५ लाख भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळीही मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने अपुर्‍या कामामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंहस्थाच्या कामासाठी कोट्यवधींची तरतूद होत असताना श्रीक्षेत्र कावनईबाबत मात्र कोणतेही तरतूद अथवा नियोजन होत नाही. सन २०१५ साली केवळ वाकी ते तीर्थक्षेत्र कावनई हा एकमेव शाहीमार्गाचे काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र, त्यानंतर आणखी कोणतेही भरीव काम झालेले नाही. त्यामुळे साधू-संतांमध्ये नाराजी पसरत आहे. श्री क्षेत्र कावनईबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून मात्र गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची ओरड आहे.

इगतपुरी मतदारसंघात सिंहस्थाचे मूळ स्थान श्री क्षेत्र कावनई व त्र्यंबकेश्वर या दोन तीर्थक्षेत्री सिंहस्थाचे शाहीस्नान होते. मात्र, अपुर्‍या सुविधांअभावी या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील विकासकामांना गती मिळावी, मुलभूत सुविधा मार्गी लागाव्यात, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न व्हावेत, तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे अशी मागणी कपिलधारा तीर्थाचे विश्वस्थ कुलदीप चौधरी यांनी केली आहे.

First Published on: July 16, 2021 10:00 AM
Exit mobile version