प्रकल्पांच्या किंमती वाढल्या म्हणून दिंडोरीतील वळण योजनाच केल्या बंद

प्रकल्पांच्या किंमती वाढल्या म्हणून दिंडोरीतील वळण योजनाच केल्या बंद

प्रातिनिधीक छायाचित्र

वजन वाढले म्हणून डाएट आणि व्यायामाचा पर्याय सुचविण्याऐवजी हात किंवा पाय असा कुठला तरी अवयव काढून टाकणे हा पर्याय होऊ शकतो का? तर नाही. पण दिंडोरीतील वळण बंधाऱ्यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. २००७-०८ साली मंजूर झालेल्या योजनांना प्रशासकीय मान्यता, सुधारीत प्रशाकीय मान्यता देत निधीचीही तरतूद करण्यात आली पण केवळ तेथील योजनांच्या किंमती वाढल्या म्हणून थेट श्रृंगारपाडा येथील ११ नंबरची वळण योजनाच बंद करण्याचा निर्णय जलसंपदा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. हे अत्यंत चुकीचे असून, श्रुंगारपाड्याला थेंबभर पिण्यासाठी पाणी नसल्याने कुठल्याही स्थितीत येथील साठवण बंधारा पूर्ण करावा, यासाठी आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरीकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली.

दिंडोरीतील चिमन पाडा, आंबाड, वायपाडा, वाघाड, करंजवन यासह विविध २० ते २१ योजनांना प्रशासकीय मान्यता होती. कामे २००७-०८ ची असल्याने विलंबामुळे त्यांना सुधारीत प्रशासकीय मान्यताही घेतली. मी स्वत: त्याचा पाठपुरावा केला होता. निधीची मंजूरी होती. कामे ही सुरू होती. पण यातील शृंगारपाडा येथील वळण योजनेसह चार-पाय योजना या प्रकल्पांच्या किंमती वाढल्या म्हणून नव्याने वाढीव निधी मंजूर करुन घेण्याऐवजी थेट योजनाच रद्द केल्या. त्यामुळे ज्या भागासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न होत हा भाग, ती गावे गत दहा वर्षापासून अद्यापही तहानलेलीच आहे. कमीत कमी या योजनांमुळे त्यांना पाणी मिळण्याची एक आशा दिसू लागली होती, पण आता तीही मावळण्यासारखेच झाले असल्याची मत या गावकऱ्यांनी व्यक्त केले. दरम्यान शृंगारपाडा या गावाला थेंबभर पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे तीनदा सर्वेक्षण झालेली अन् तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यताही असलेल्या ११नंबरच्या साठवण बंधाऱ्याची योजना तरी पूर्णकरावी. यासाठी ग्रामस्तांसह आमदार झीरवाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे स्थानिक यंत्रणा आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांशीच चर्चा करुन यासाठी निधी उपलब्धीसह कुठल्याही स्थितीत योजना पूर्ण करण्याची मागणी केली. तर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांशीही भेट घेणार असल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

First Published on: January 14, 2019 8:54 PM
Exit mobile version