अल्पसंख्याकांच्या योजनांबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ

अल्पसंख्याकांच्या योजनांबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ

नाशिक : नाशिक जिल्हयातील अल्पसंख्याक समाजासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी आराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. २७) बैठक घेण्यात आली खरी; मात्र अल्पसंख्यांक समाजासाठी राबविण्यात येणार्‍या पंधरा कलमी कार्यक्रमांबाबत प्रशासन पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे या बैठकीत पुढे आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेख यांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरत २० जिल्ह्यांमध्ये दौरे करतांना सर्वाधिक वाईट अनुभव नाशिकमध्ये आल्याची संतप्त भावना व्यक्त केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार असल्याचेही शेख यांनी स्पष्ट केले.

नाशिक जिल्हयातील अल्पसंख्याक समाजासाठी शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा शेख यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीत अधिकार्‍यांनाच अल्पसंख्याक योजनांची माहीती नसल्याचे दिसून आले. शासनाने विविध योजनांसाठी २०१७-२०१८ साठी निधीही देऊ केला; मात्र या निधीचा विनियोग किती प्रमाणात करण्यात आला याबाबत अधिकार्‍यांना विचारणा केली असता अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने शेख यांनी अधिकार्‍यांची चांगलीच खरडपटटी काढली. आयोगाच्या बैठकीपूर्वी अध्यक्षांना अहवाल सादर केला जातो, परंतु त्याबाबत माहितीच उपलब्द्ध नसल्याचे कारण देत अवघा चार पानी अहवाल देण्यात आला, यावरून अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.अल्पसंख्याक समाजाबाबत काही करूच नये, असे आपले मत तयार झाले आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी बैठकीत केला.जवळपास २० जिल्ह्यांमध्ये दौरे केले परंतु सर्वात वाईट अनुभव नाशिक जिल्ह्यात आल्याचा रोष त्यांनी बैठकीत व्यक्त केला. एकूणच प्रशासनाने दाखवलेली उदासीनता सरकारच्या कामकाज आणि नियमांची पायमल्ली करत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कारणे दाखवा नोटीस

यावेळी शिक्षण, कौशल्य विकास विभाग आणि अनेक विभागाचे अधिकारी उपस्थितच नसल्याबाबतही त्यांनी त्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे, त्याची प्रत आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

First Published on: December 28, 2018 12:38 PM
Exit mobile version