एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात

एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी अंधारात

एसटीचे अधिकारी, कर्मचार्‍यांना दरवर्षी दिवाळी बक्षीस म्हणून एसटी महामंडळाकडून देण्यात येणारे अडीच ते पाच हजार रुपये यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे देता येणार नाहीत. त्यामुळे यंदा एसटी कर्मचार्‍यांच्या सानुग्रह अनुदानावर गदा आली असून, त्याचा फटका सुमारे 1 लाख एसटी कर्मचार्‍यांना बसणार आहे.
एसटीकडून दरवर्षी सानुग्रह अनुदान म्हणून कर्मचार्‍यांना दर दिवाळीला ठराविक रकम दिली. जाते. ही रकम देताना कर्मचार्‍यांना दिवाळी ज्या महिन्यात असेल, त्या महिन्यात वेतनाबरोबर अदा करण्यात येत असते. गेल्या एसटीच्या कर्मचार्‍यांना अडीच हजार रुपये तर अधिकारी वर्गाला 5 हजार रूपये अनुदान दिवाळी बक्षीस म्हणून वेतनाबरोबर देण्यात आलेले होते. त्यामुळे एसटीच्या कर्मचार्‍यांच्या दिवाळी उत्साहात भर पडली होती.

सानुग्रह अनुदान द्यावे किंवा नाही, हा एसटीच्या वेतन कराराचा भाग नसून, ही बाब महामंडळाच्या इच्छेखातर अथवा मनावर अवलंबून असलेला भाग असतो. लोकप्रियेतेची ही बाब असल्याने शासनाकडून दर दिवाळीला सानुग्रह अनुदान देण्याचा प्रघात आहे. त्याची वेतनकरार अथवा कायदेशीर नोंद नाही किंवा ते दिलेच पाहिजे, अशी कोणतीही तजवीज एसटी महामंडळाने केलेली नाही. त्यामुळे दिल्या जाणार्‍या सानुग्रह अनुदानासाठी कर्मचार्‍यांना दावाही करताना येत नाही. ही बाब महामंडळासाठी ऐच्छिक असते.

वेतन अगोदरच मिळणार!

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 21 सप्टेंबरपासून लागु झालेली आहे. तसेच, निवडप्रक्रिया 24 ऑक्टोबरपर्यत चालणार आहे. तर दिवाळीचा उत्सव ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. एसटी कर्मचार्‍यांचा सप्टेंबर महिन्याचे वेतन हे ऑक्टोंबर महिन्यात पहिल्या आठवड्यातच होईल, त्यामुळे त्यांच्या हातात दिवाळी अगोदर वेतनाची रक्कम असेल. मात्र, आचारसंहितेमुळे सानुग्रह अनुदान खात्यावर जमा होणार नाही, अशी खात्री एसटी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना वाटत आहे.

First Published on: September 23, 2019 11:59 PM
Exit mobile version