डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुरुवात; वाहतूक मार्गात बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुरुवात; वाहतूक मार्गात बदल

शिवजन्मोत्सव समिती नाशिकरोडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आणि भीमसैनिक.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील विविध संस्था, संघटना व पक्षांच्या वतीने आयोजित अभिवादन, प्रबोधनपर मिरवणूक अशा सामाजिक कार्यक्रमांना रविवारी, १४ एप्रिलला सकाळपासूनच सुरुवात झाली. जेलरोड, नाशिकरोड, व्दारका, पंचवटी, सातपूरसह इतर परिसरांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले. यानिमित्त शहरातील विविध रस्ते व चौकांमध्ये विद्युत रोषणाई, व्यासपीठ, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी शहरातील आंबेडकरांचे अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहतानाच, बुद्धवंदनेसाठी मोठी गर्दी करणार आहेत. रविवारी उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चित्ररथाचे स्वागत केले जाईल. दरम्यान, सोमवारपासून पाच दिवस अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा कार्यक्रम, अनिरूद्ध वणकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, साजन बेंद्रे यांच्या गीतांचा कार्यक्रम, भीमगीते, जितू देवरे यांचा ऑर्केस्ट्रा इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. शहरात सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक स्वागत व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाशिकरोड बसस्थानक, पोलीस चौकीशेजारी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पुतळ्यासमोर विद्युत रोषणाईसह मंडप उभारण्यात आला आहे. शहरातील विविध रस्त्यावर व्यासपीठ उभारून देखावे साकारण्यात आले आहेत. भीमसैनिकांनी दुचाकींसह दुभाजकांमध्ये निळे ध्वज लावल्याने संपूर्ण शहर आंबेडकर जयंतीसाठी सज्ज झाले आहे.

दुपारी १२ पासून वाहतूक मार्गात बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (ता.१४) शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दुपारी १२ ते मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावर हातगाड्या, बैलगाड्या, सायकल, दुचाकी, चारचाकी वाहनांसह इतर वाहनांना बंदी राहणार आहे. बंद असलेल्या मार्गावर पोलीस वाहने, रूग्णवाहिका, शववाहिका, अग्नीशमन दलाची वाहने जाऊ शकतील. वाहनांना परवानगी आहे. वाहनचालकांसाठी नाशिक शहर वाहतूक शाखेने पर्यायी मार्गाचे नियोजन केले आहे. या मार्गाचा वापर वाहनचालकांनी करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले आहे.

हे मार्ग राहतील बंद

मोठा राजवाडा (भद्रकाली)-वाकडी बारव (चौक मंडई)-कादिर चौक-दादासाहेब फाळके रोड-महात्मा फुले मार्केट-अब्दुल हमीद चौक-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-गाडगे महाराज पुतळा-मेनरोड, (गो.ह.देशपांडे पथ)- धुमाळ पॉईंट-रविवार कारंजा-रेडक्रॉस-सांगली बँक-नेहरू गार्डन-व्यापारी बँक- ममता वॉच कंपनी- देवी मंदिर शालीमार -दीपसन्स कॉर्नर- शिवाजी रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा.

हे आहेत पर्यायी मार्ग

दिंडोरी नाका, मालेगांव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल मार्गे शालीमार व सीबीएसकडे जाणार्‍या शहर बसेस व सर्व वाहने दिंडोरीनाका येथुन पेठ फाटा सिग्नल-मखमलाबाद नाका-रामवाडी पूल- अशोकस्तंभ- मेहर सिग्नल- सीबीएस सिग्नल- मोडक सिग्नल- गडकरी चौक सिग्नलमार्गे नवीन नाशिक व नाशिकरोड.

First Published on: April 14, 2019 10:18 AM
Exit mobile version