हिंदू धर्म सनातन राहणार नाही, इथपर्यंत परिस्थिती निर्माण झाली पण…

 हिंदू धर्म सनातन राहणार नाही, इथपर्यंत परिस्थिती निर्माण झाली पण…

हिंदू संस्कृतीवर आजवर इतके आघात झाले, परिस्थितीनुरुप प्रलोभनांचे जाळे टाकण्यात आले. इतक्या विकृत स्तरापर्यंत प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे हिंदू धर्म हा सनातन धर्म आता राहिलेला नाही, अशी शंका घेण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली. परंतु, धर्मावर जेव्हा संकट निर्माण झाले तेव्हा हिंदू धर्म नव्या जोमाने, उमेदीने उभा राहिला आणि आजही तो भौतिक व अध्यात्मिक मार्गांनी पुढे जात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
प. पू. स्वामी श्री सवितानंद यांचा अमृत सोहळा गंगापूर रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे गुरुवारी (दि.15) पार पडला. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच डॉ. भागवत म्हणाले, ‘भगवतगीता हा वयोवृद्ध काळात वाचण्याचा ग्रंथ नसून तो तरुणांनी आत्मसात करण्याचा ग्रंथ आहे.’ त्यांच्या या वाक्यामुळे 1960 च्या दशकात एका अध्यात्मिक स्पर्धेत त्यांना उत्तम प्रकारे गुण मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. ते पुढे म्हणाले, तरुण पिढीला त्यांच्या भाषेत अध्यात्मिक जीवन समजावून सांगण्याचे कार्य प. पू. सवितानंद यांनी केले आहे. निस्पृह आयुष्य जगणारे सवितानंद यांचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी जोडणारे असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे मान्य केले. स्वत:साठी जगण्यापेक्षा इतरांना काय देता येईल, यासाठी जीवन जगणार्‍या व्यक्तींचे स्वभाव कधी ना कधी जुळतात. त्यामुळे स्वामी संवितानंद यांचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऋणानुबंध दृढ होत गेल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कॉलेज जीवनातील अनुभव सांगताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, 1960 मध्ये महाविद्यालयात असताना भगवत गीतेवर आधारित एका स्पर्धेत सहभागी होण्याची सूचना प्राचार्यांनी केली. स्पर्धेची घोषणा यापूर्वीच होऊन गेलेली असल्यामुळे ऐनवेळी जावे लागले. या स्पर्धेचा निकाल काय लागला हा भाग वेगळा परंतु, केवळ भाषणाची सुरुवात भगवतगीता हा फक्त वयोवृद्ध व्यक्तींसाठी नसून तरुणांसाठी आहे, अशी सुरुवात केली. त्यामुळे या स्पर्धेत जास्त गुण मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. स्वामी सवितानंद यांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वामींच्या जीवनावार आधारित स्मरणिकेचे प्रकाशन डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

First Published on: July 16, 2021 11:46 AM
Exit mobile version