दुष्काळ आणि मंदीच्या कचाट्यात डाळिंब

दुष्काळ आणि मंदीच्या कचाट्यात डाळिंब

कमी दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने डाळिंब शेती संकटात आली आहे. तीव्र पाणी टंचाईमुळे राज्यातील डाळिंब उत्पादकांचे अर्थकारणच कोलमडले आहे. त्यात डाळिंबाचे क्षेत्र आणि उत्पादनात मागील पाच वर्षात पाच पटीने वाढ झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

राज्यात १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. नाशिकमधील डाळिंबाचे क्षेत्र ४८ हजार ५२७ हेक्टर आहे. देशातील एकूण डाळिंब उत्पादनाच्या ९० टक्के डाळिंबाचे क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील डाळिंब उत्पादनात नाशिक सर्वात पुढे आहे. राज्यात नाशिक, सोलापूर, नगर, पुणे, धुळे, सांगली, औरंगाबाद, सातारा, बीड, उस्मानाबाद, जालना, बुलडाणा, लातूर या १३ जिल्ह्यांत प्रामुख्याने डाळिंब पीक होते. या तालुक्यांतही अवर्षणग्रस्त भागाताच डाळिंब पिक घेतले जाते. गेली अनेक वर्षे डाळिंब हे पीक टंचाईग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. डाळिंबाने २०१० च्या दशकांपर्यंत शेतकर्‍याचे जीवनमान उंचावले आहे.

मात्र काही वर्षांपासून या वैभवालाच दृष्ट लागली आहे. तेलकट डाग हा रोग नियंत्रणात येत नसताना काही प्रमाणात शेतकरी डाळिंब पिकापासून दूर गेले आहेत. वातावरणातील बदल, वाढता उत्पादन खर्च, मजूर टंचाई या आव्हानांना तोंड द्यावे लागत असताना आता तीव्र दुष्काळ अन बाजारातील मंदीनेही उत्पादकांना हैराण केले आहे. मागील पाच वर्षात डाळिंबाचे क्षेत्र आणि उत्पादनात भरमसाठ वाढ झाली आहे. मागील तीन ते चार वर्षात कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यातही डाळिंब लागवड वाढली आहे.

उत्पादनात पाच पटीने वाढ
‘अपेडा’च्या माहितीनुसार वर्ष २०११-१२ मध्ये राज्यातील डाळिंबाचे उत्पादन ४ लाख ७८ हजार टन होते. वर्ष २०१७-१८ मध्ये हे उत्पादन वाढून तब्बल २७ लाख ९५ हजार टनापर्यंत पोहोचले. मागील पाच वर्ष उत्पादनात १० ते २० टक्क्यांनी वाढ होत आली आहे.

मंदी अन दुष्काळाचा तडाखा
२०१८-१९ या वर्षात राज्यातील उत्पादन दुष्काळामुळे घटून १५ लाख टनांपर्यंत आले आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत देशातील उत्पादनात ३० टक्के तर राज्यातील उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. यंदा दुष्काळामुळे उत्पादनात घट झाली असली तरी मागील ५ वर्षे क्षेत्र व उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. या स्थितीत देशांतर्गत बाजारपेठेतील डाळिंबाचे बाजारभाव कोसळलेे आहेत. डाळिंब उत्पादकांना मंदी अन दुष्काळाच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.

प्रक्रिया उद्योगाला चालना हवी
‘‘डाळिंब फळापासून विविध प्रकारचे प्रक्रिया उद्योग उभारणे शक्य आहे. डाळिंबात आरोग्यवर्धक तसेच अनेक औषधी गुणधर्म आहे. डाळिंब शेती संकटातून जात असताना शासनस्तरावरून प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.’’
-अरुण देवरे, उपाध्यक्ष- महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघ, पुणे.

बागा वाचवण्याचाच खर्च वाढतोय
‘‘अत्यंत कमी पाणी असताना डाळिंबाचा बहार धरणे अवघड बनले आहे. या स्थितीत बागा वाचविण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबावे लागत आहेत. त्यामुळे खर्च वाढला आहे.’’
-किरण वाघ, डाळिंब उत्पादक- बागलाण.

मागील ७ वर्षातील डाळिंब उत्पादन (टनामध्ये)
वर्ष—-उत्पादन
२०११-१२—४,७८,०००
२०१२-१३—४,०८,०००
२०१३-१४—९,४५,०००
२०१४-१५—१३,१३,३७०
२०१५-१६—१८,००,०००
२०१७-१८—२७,९५,०००
२०१८-१९—-१५,००,००० (डिसेंबर २११८ पर्यंत)

ज्ञानेश उगले 

First Published on: January 20, 2019 5:59 AM
Exit mobile version