सिन्नरच्या पूर्व भागाला वादळाचा तडाखा, ७०० कोंबड्यांचा बळी

सिन्नरच्या पूर्व भागाला वादळाचा तडाखा, ७०० कोंबड्यांचा बळी

जोरदार वादळाने उद्ध्वस्त झालेले पोल्ट्रीचे शेड

अचानक आलेल्या वादळी वार्‍याने सिन्नरच्या पूर्व भागात धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी या परिसरातील शेतकर्‍यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. सायंकाळी ७ च्या दरम्यान वादळाचे थैमान सुरू झाले. त्यात वावी, पांगरी, मिठसागरे, मिरगाव, शहा या परिसरात वादळाचे प्रमाण जास्त होते.

नांदूर शिंगोटे, खंबाळे, भोकणी, देवपूर परिसरात जोरदार गारांचा पाऊस झाल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काहींचा संसार उघड्यावर पडला आहे. पांगरी-निर्‍हाळे रोड लगत बापू सोपान दळवी यांच्या घराचे पत्र्याचे छत उडून गेले. तसेच त्यांचे पोल्ट्री व्यवसाय संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. वादळाने जवळपास २०० कोंबड्या दगावल्या. घर आणि व्यवसाय दोन्ही उद्ध्वस्त झाल्याने या शेतकर्‍याला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. वावी येथील आशीष माळवे यांच्या शेतातील राहत्या घराचे संपूर्ण छताचे पत्रे उडून गेले आहेत. माजी सरपंच चंद्रकांत वेलजाळी यांच्या शेतातील जनावरांचे गोठ्यावरील संपूर्ण पत्रे उडून गेले आहेत. यामुळे जनावरांना इजा झाली आहे. येथील रहिवासी गणेश काटे सायंकाळच्या दरम्यान वादळ आल्याने आपल्या घरात बसलेले घराचे छत उडून गेले सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, सर्वाधिक नुकसान मिरगाव येथील प्रकाश शेळके यांचे झाले आहे. त्यांचे पाच हजार कोंबड्या क्षमतेचे तीन मोठ मोठे शेड आहेत. या वादळामुळे तीनही पोल्ट्रीचे छत उडून गेले. यामुळे ७०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. प्रकाश शेळके यांना पत्र्यांचा मार लागून जखमी झाले. या शेतकर्‍याचे अंदाजे आठ ते नऊ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याकरता तहसीलदार यांनी तलाठ्यांना आदेश दिले होते. मात्र, तलाठ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. केवळ कोतवालाच्या भरवशावर पंचनामे करण्यात आले आहेत.

First Published on: April 14, 2019 10:15 PM
Exit mobile version