नाशिक पश्चिममध्ये खुर्चीचा खेळ

नाशिक पश्चिममध्ये खुर्चीचा खेळ

State Election Department

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढलेला असताना राजकारणात जशी खुर्चीसाठी चढाओढ सुरू आहे, त्याचप्रमाणे आता प्रशासनातही खुर्चीचा खेळ रंगल्याचे चित्र आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी संजय बागडे महसूल प्रबोधिनीचे सहायक प्राध्यापक संजय बागडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, बागडे यांची नियुक्ती करताना आयोगाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आयोगाने तातडीने हे आदेश रद्द करत निवडणूक निर्णय अधिकारीपदी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची नियुक्ती केली. सदरचे आदेश शुक्रवारी विभागीय अधिकारी राजाराम माने यांनी पारित केले.

पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गावंडे यांचा अपघात झाल्याने त्यांच्या जागी महसूल प्रबोधिनीचे सहायक प्राध्यापक संजय बागडे यांची नियुक्ती करण्यात आली. बागडे यांची नियुक्ती करताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना तिलांजली देण्यात आल्याचे दै. आपलं महानगरने उघड केले होते. त्यानंतर बागडे यांच्या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हरकत घेतली. तसेच, प्रशासकीय वर्तुळातूनही याबाबत हरकत नोंदविण्यात आली होती. बागडे यांनी यापूर्वी नाशिक जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी पदावर सुमारे साडेपाच वर्ष सेवा बजावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात याच कारणास्तव त्यांची अहमदनगर जिल्ह्ययात बदली करण्यात आली होती. तथापि, आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांची नाशिक जिल्ह्यात बदली करण्यात आली असून, या बदली आदेशामुळे निवडणूक आयोगाच्या ११ जुलै २०१९ आणि १६ जानेवारी २०१९ रोजीच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होत असल्याचे मुुंडे यांनी निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत शुक्रवारी झालेल्या आयोगाच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सदरचे आदेश रद्द करण्याबाबतचे आदेश देण्यात आले.

त्यानुसार विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मागील आदेशात बदल करून निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, दोन दिवसांच्या या घडामोडीत प्रशासनातही खुर्चीचा खेळ रंगल्याचे दिसून आले.

First Published on: October 18, 2019 10:21 PM
Exit mobile version