शरद पवारांच्या नाशिक, दिंडोरी दौर्‍यात ठरणार निवडणूक रणनिती

शरद पवारांच्या नाशिक, दिंडोरी दौर्‍यात ठरणार निवडणूक रणनिती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये तर भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीने पुन्हा एकदा नाशिक लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे ३ मार्च रोजी दोन दिवसीय नाशिक दौर्‍यावर येत असून पवारांच्या उपस्थितीत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेऊन उमेदवारी निश्चित होण्याची शक्यताही नाकारत येत नाही. पवारांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यात येणारे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघ हे महाआघाडीत राष्ट्रवादीला सोडण्यात आले आहे. मात्र, गत निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला. २०१४ च्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा पावणेदोन लाख मतांनी पराभूत केल्याने हा पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला. मात्र मोदी लाट आणि मराठा, ओबीसी अशा जातीयवादी प्रचाराची किनार यामागे असल्याचे बोलेले जाते. परंतु, आता पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेल्याने यंदाची नाशिकची राजकीय परिस्थिती बदलली असल्याचा सूर उमटतोय. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा जोरकसपणे निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून पवारांनी देशात आणि राज्यात सर्व विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्यास सुरुवात केली असून पक्षाने एक एक जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याअनुषंगाने शरद पवार यांचा नाशिक दौरा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौर्‍यात पवार नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता चांदवड येथे ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तर ४ मार्च सोमवारी सकाळी १०: वाजता चोपडा लॉन्स येथे नाशिक मतदारसंघातील बुथप्रमुख आणि पदाधिकार्‍यांचा मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तसेच रविवारी पक्षाच्या शहर शाखेतर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.
या दरम्यान विविध नेत्यांनी पवारांची भेट मागितली आहे. पक्षातील इच्छुक उमेदवारांसह अन्य नेत्यांशीही पवार चर्चा करणार असल्याने नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचा निर्णय होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

भुजबळांविरोधात एक गट सक्रिय

नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ कुटुंबातूनच एक उमेदवार असेल असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. मात्र समीर भुजबळ की स्वतः छगन भुजबळ निवडणूक रिंगणात उतरणार हे गुलदस्त्यात आहे. समीर भुजबळ यांच्याकरीता राजकीय वातावरण अनुकुल नसल्याचा सूर राष्ट्रवादीतून उमटत असल्याने छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्यावी याकरीता पक्षातील एक गट पवारांची भेट घेणार असल्याचेही समजते. याबाबत पवार काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिंडोरीचा तिढा सुटणार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा भारती पवार या दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले धनराज महाले यांचेही नाव चर्चेत असल्याने दिंडोरीत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे. डॉ. पवार यांच्याच परिवारातून त्यांच्या उमेदवारीकरीता होत असलेला सुप्त विरोध पाहता पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षांतर्गत विरोधामुळे ऐनवेळी काहीही होण्याची शक्यता

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे तळ्यातमळ्यात आहे. पक्षाने त्यांना तयारी सुरू करण्याचे फर्मान दिले असले, तरी दुसरीकडे भाजपकडून उमेदवाराचा शोधही सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे सेनेकडून प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी पक्षांतर्गत विरोधामुळे ऐनवेळी काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पवार हे राजकीय तज्ज्ञ मानले जातात. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर पवार पक्षाकडून कोणाला मैदानात उतरवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: February 27, 2019 11:21 PM
Exit mobile version