लोकशाही सुदृढतेसाठी शाळांमध्ये होणार निवडणूक; कळवणमध्ये राबवला जाणार उपक्रम

लोकशाही सुदृढतेसाठी शाळांमध्ये होणार निवडणूक; कळवणमध्ये राबवला जाणार उपक्रम

कळवण : जगातली सर्वोत्तम लोकशाही म्हणून भारतीय लोकशाही ओळखली जाते. लोकशाहीची ओळख शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्हावी आणि मतदान प्रक्रियेविषयी जाणून घेत असताना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत विद्यार्थी सहभागी व्हावेत हा उद्देश समोर ठेऊन कळवणचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी विशाल नरवाडे यांच्या संकल्पनेतून शाळास्तरावर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. लोकशाही सुदृढतेसाठी नरवाडे यांची अभिनव संकल्पना राज्यभर आदर्शवत ठरणार आहे.

भारतीय लोकशाही ही जगात सर्वोत्तम समजली जाते.१८ वर्षापुढील प्रत्येक भारतीय नागरिकास मतदानाचा अधिकार प्राप्त असतो.मात्र, शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कानावर निवडणूक,प्रचार,मतदान,मतमोजणी हे शब्द कानावर पडत असल्याने त्यांना निवडणुक प्रक्रियेविषयी कुतुहुल असते.शाळेत मॉनिटर आणि वर्गाचे मंत्रिमंडळ निवडले जात असले तरी मतदान प्रक्रिया फार क्वचित ठिकाणी पार पडते.हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना लोकशाही चे महत्व कळावे,निवडणूक प्रक्रिया कशी असते याची माहिती व्हावी,प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागही संधी मिळावी व भविष्यात मतदान प्रक्रियेस सामोरे जाताना कुठलीही अडचण येऊ नये या उद्देशाने कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रकल्पांतर्गत येणार्‍या सर्व शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये निवडणुक प्रक्रिया राबविण्याचा अभिनव निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन प्रतिनिधी निवडून शालेय मंत्रिमंडळ नियुक्त होईल. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रिया समजून घेता येणार असून सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांची ही अभिनव संकल्पना भविष्यात राज्यातील शाळांसाठी आदर्शवत आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

निवडणूक प्रक्रिया प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक आहे. १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार असतो. शाळेत विद्यार्थ्याना निवडणुक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी आणि त्यांना लोकशाही,मतदानाचे महत्व कळावे या उद्देशाने शाळास्तरावर निवडणूक घेण्यात येणार आहे. : विशाल नरवाडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकरी, कळवण

First Published on: January 28, 2023 12:11 PM
Exit mobile version