संशोधन प्रकल्प अन् ऑनलाईन शिक्षणावर भर देणार; मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे

संशोधन प्रकल्प अन् ऑनलाईन शिक्षणावर भर देणार; मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे

नाशिक : दूर शिक्षणाच्या माध्यमातून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात शिक्षणाचे स्त्रोत उपलब्ध करून दिले आहेत. मुक्त विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू दिवंगत डॉ. राम ताकवले यांनी सुरू केलेली ही शिक्षणाची गंगोत्री समृद्ध होत गेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली व्याप्ती वाढवत नेण्याची क्षमता असलेल्या या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे हाती घेताना विद्यार्थीभिमुख धोरणांची आखणी व अंमलबजावणी याचा साकल्याने विचार करणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्रचना, रोजगाराभिमुख शिक्षणक्रम आणि पदवी शिक्षणक्रम ऑनलाईन स्वरूपात सुरू करणे यावर भर देणार आहे, अशी ग्वाही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी दिली. प्रा. सोनवणे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार मंगळवारी (दि. २३) प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्याकडून स्वीकारला. याप्रसंगी एक वर्षाहून अधिक काळ प्रभारी कार्यभार सांभाळणारे कुलगुरू डॉ. पाटील यांना विद्यापीठाच्यावतीने निरोप देण्यात आला. कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणक्रमांची व्याप्ती कशी वाढवता येईल, यावर भर द्यावा लागेल. येत्या काळात संशोधनाला चालना दिली जाईल.

संशोधनाला पैसा लागतो, ही मानसिकता बदलावी लागेल. स्थिती, संबंध, कारण आणि परिणाम या तत्वांच्या आधारे संशोधन प्रणालीकडे बघावे. वर्षभरात अभिमानाने सांगता येईल अशी स्थिती संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने गाठायला हवी. मी या विद्यापीठातून काही घ्यायला आलो नाही, द्यायला आलेलो आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, सर्वसाधारण घटकांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवायचे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे ऑनलाईन शिक्षणक्रम सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांपर्यंत आपल्याला पोहोचायचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात दूर शिक्षणाला सर्वाधिक महत्व प्राप्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची क्षमता विद्यापीठात आहेच. त्यासाठीच सूक्ष्म नियोजनातून विकास आराखडे आखले जाऊन विद्यापीठाची दिशा ठरवली जाईल.

भरतीप्रक्रियेवर काम करणार

मनुष्यबळ समस्या सोडवण्यासाठी गुरुवारपासूनच भरतीप्रक्रियेवर काम सुरू केले जाईल. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबविली जाईल, असे प्रा. सोनवणे यांनी सांगितले.

First Published on: May 24, 2023 5:52 PM
Exit mobile version