बाटलीत पेट्रोल न दिल्याने कर्मचार्‍याला मारहाण

बाटलीत पेट्रोल न दिल्याने कर्मचार्‍याला मारहाण

प्रातिनिधिक फोटो

बाटलीत पेट्रोल देण्यास नकार देणार्‍या पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍याला मोटारसायकलवरुन आलेल्या तीनजणांनी लोखंडी पाईप व हाताने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.१७) दुपारी २ वाजेदरम्यान श्री. कुबेर फिवुल पेट्रोलपंप, त्र्यंबक नाका येथे घडली. याप्रकरणी शोधन वाल्मिक कुमावत यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटारसायकल (एमएच १५-एच बी ९७६८) च्या चालकासह अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोधन कुमावत पेट्रोल पंपावर काम करत असताना मोटारसायकलवरुन दोनजण आले. त्यातील एकाने कुमावत यांच्याकडे बाटलीत पेट्रोलची मागणी केली. बाटलीत पेट्रोल देण्यास मनाई असल्याने कुमावत यांनी पेट्रोल देण्यास नकार दिला. राग अनावर झाल्याने दोनजणांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. पुन्हा १० मिनिटांनी दोनजण एकाला घेऊन परत आले. तिघांनी मिळून त्यांना पुन्हा लोखंडी पाईप व हाताने मारहाण केली. त्यात ते जखमी झाले असून एक हजार रुपये गहाळ झाले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार सातभाई करत आहेत.

First Published on: September 18, 2020 12:53 PM
Exit mobile version