वाचा आणि हसा.. भाजपा मुलाखतीला आलेल्या इच्छुकांचे किस्से

वाचा आणि हसा.. भाजपा मुलाखतीला आलेल्या इच्छुकांचे किस्से

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शहरात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या दरम्यान त्यांचं आधीच ठरलंय मुलाखती फक्त औपचारिकता असे म्हणत इच्छुकांच्या मनातील खदखद बाहेर पडली. या गांभीर्यपूर्वक वातावरणात असे काही किस्से घडलेत की ज्यामुळे उपस्थितांच्या चेहर्‍यावर आपसूकच हसू फुलले..

मी आमदार दिनकरअण्णा पाटील शपथ घेतो की…

दिनकर पाटील मुलाखतीला गेले तेव्हा ते अक्षरश: मी दिनकरअण्णा पाटील शपथ घेतो की.. असे पुटपुटत असल्याचे आढळून आले. यावेळी ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने याविषयी उत्सूकतेपोटी विचारले असता, माझे तिकीट फिक्स आहे. त्यामुळे शपथविधीची आतापासूनच तयारी करुन ठेवतोय अशी मार्मिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आम्ही मुंबईत आणि मॅडमने तिकीट आणले गुजरातमधून

आमच्या श्रेष्ठींचं आधीच ठरलेले असते, मुलाखतींचा केवळ फार्स आहे असे सांगत एका ज्येष्ठ नगरसेवकाने गेल्या निवडणुकीचा किस्सा आपल्या सहकार्‍यांना सांगितला. गेल्यावेळी मध्य नाशिक मतदारसंघातून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. त्यात मीदेखील होतो. आम्ही एकत्रितरित्या मुंबईला तिकीट मागायला गेलो. आम्ही मुंबईत तिकीट मागेपर्यंत मॅडम गुजरातहून तिकीट घेऊन आल्या होत्या, असे सांगताच एकच हशा पिकला.

‘नमस्ते सदावत्सले..’

पूर्व मतदारसंघातून इच्छूक असलेल्या एका इच्छूकाने मुलाखतीला बसल्यावर ‘नमस्ते सदावत्सले..’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना म्हटली. संघातील इच्छुक म्हटल्यावर त्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होईल अशी त्याची भोळी आशा. पण त्याचवेळी उपस्थित असलेल्या एकाने टोला लगावला की, अहो अन्य पक्षातून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते आता हाफ पॅन्ट घालून फिरतात..

महेश हिरेंसमोर सीमा हिरेंची तक्रार-

सातपूर येथील एक अपंग कामगार आपले गार्‍हाणे मांडण्यासाठी थेट मुलाखत स्थळी पोहचला. तेथे मध्य नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे आपबिती सांगत कंपनीत आपला बोट कापला गेल्यानंतर नुकसान भरपाई देणे दूरच आपल्याला नोकरीवरुन काढून टाकले असे सांगितले. तो बोलत असतानाच पश्चिम मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे यांचे पती महेश हिरे शेजारीच उभे होते. पण त्याने हिरे यांना ओळखलेच नाही. ‘मी हिरे मॅडमकडे गेलो, पण त्यांनी दखल घेतली नाही वगैरे वगैरे सांगत त्याने तक्रारीचा पाढा सुरु केला. अखेर पत्रकारांनीच त्याला शेजारी हिरे साहेब उभे असल्याचे खुणावले. त्यामुळे त्याने आपला पवित्रा बदलत त्यांच्याकडे मदतीची याचना केली.

हिरे दांपत्याची मुलाखत-

पश्चिम नाशिक मतदारसंघाचे आमदार सीमा हिरे या मुलाखतीला गेल्यावर त्यांच वेळी त्यांच्या पतीलाही आत बोलवण्यात आले. त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांच्या पतीचा विचार सुरु आहे की काय अशी शंका बाहेरील इच्छूकांना आली.

शहरी उमेदवारात ‘संशयकल्लोळ’

नाशिकमधील तीनही मतदारसंघासाठी मुलाखती घेतल्या, मात्र त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज भरुन घेण्यात आले नाहीत. तर ग्रामीण मतदारसंघांसाठी इच्छुकांकडून अर्ज घेण्यात आलेत. पश्चिम मतदारसंघातील एक इच्छुक मुलाखत आटपून बाहेर पडला. घराकडे निघतानाच त्याला एका ग्रामीण भागातील नेत्याने विचारले अर्ज भरला का? शहरी मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज घेतले नाहीत, असे त्याने सांगताच समोरच्या ग्रामीण नेत्याने सावधगीरीचा सल्ला दिला. हा भाजप आहे, कुणाचा कधी गेम होईल हे सांगता येत नाही. अर्जाबाबत पून्हा तपास करुन घ्या, नाहीतर उमेदवारी जाहीर होण्याच्या वेळी सांगितले जाईल की तुम्ही अर्ज भरला नाही म्हणून तुमचे नाव उडले’.. या सल्ल्यानंतर या इच्छुकाची एकच धावपळ उडाली. पण चार लोकांना विचारल्यावर कळले की, शहरासाठी खरोखच अर्ज भरुन घेतलेले नव्हते.

First Published on: September 4, 2019 11:55 PM
Exit mobile version