नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची ११ देशांत २२०० मेट्रिक टन निर्यात

नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची ११ देशांत २२०० मेट्रिक टन निर्यात

राकेश बोरा । लासलगाव : यंदा द्राक्ष हंगामापूर्वी अवकाळी पावसाच्या संकटावर मात करीत जिल्ह्यातील द्राक्षाची निर्यात जोरदार सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ११ देशात १६९ कंटेनर मधून २२०० मेट्रिक टन द्राक्ष सातासमुद्रापार पोहोचले आहेत.
राज्यात नाशिक आणि सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यामध्ये नाशिक जिल्ह्यात निफाड, दिंडोरी, चांदवड, सटाणा, देवळा आणि मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची लागवड करण्यात आली आहे. गत दोन वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये द्राक्षांचा हंगाम सापडला होता. यंदाही पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

त्यामुळे द्राक्ष उत्पादकासमोर हवामानासह कोरोनाचे संकट आहे. मात्र, या संकटातही जिद्दी शेतकरी आपल्या अनुभवाच्या जोरावर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत आहे. यावर्षी २५ जानेवारीपर्यंत तब्बल २२०० मेट्रिक टन द्राक्ष परदेशात रवाना झाले आहे. सध्या निर्यात क्षम द्राक्षास प्रति किलोस ८५ ते १०० रुपये असा दर आहे. अद्यापही मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार असून यापेक्षा जादा दर मिळण्याच्या आशा बागायतदारांना आहेत. जिल्ह्यातील काढणीला आलेले आणि फुलोर्यात असणार्या द्राक्ष बागांचे पावसाने मोठे नुकसान झाले. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजले. या परिस्थितीतून शेतकर्यांनी बागा वाचवण्याचा प्रयत्न केला होता.

पर्यावरणीय बदलामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस आतबट्टयाचा ठरत आहे. मागच्या पिढीकडे असणारा पाच-पन्नास एकराची शेती आज गुंठ्याच्या प्रमाणात उरली आहे. सिंचन सुविधा जरी असली तरी रोज बदलत असलेल्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल अशी कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. यामुळे शेती करणे जिकिरीचे तर झाले आहेच, पण उत्पादित मालाला बाजारात हवा तसा दर मिळेल याचीही खात्री उरलेली नाही. कारण बर्‍याचवेळा मालाचे उत्पादन एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जादा झाल्याने भाव पडतात. किंवा जाणीवपूर्वक पाडले जातात. याला काही अंशी बाजारातील संघटित वर्गाची मक्तेदारीही कारणीभूत जशी आहे तसेच शासनाचे आयातनिर्यात धोरणही कारणीभूत आहे. अशा अनेक अडचणींवर मात करत मात्र जिद्दी शेतकरी द्राक्ष निर्यात करत आहे.

प्रमुख देशातील द्राक्ष निर्यात आकडेवारी 

First Published on: January 30, 2022 8:40 AM
Exit mobile version