बनावट करारनामा करत ५० लाखांची मागणी

बनावट करारनामा करत ५० लाखांची मागणी

प्रातिनिधीक फोटो

जमिनीचा बनावट करारनामा करीत संबंधित जमिन मालकाच्या भावास चार जणांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार इंदिरानगर परिसरात घडला. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर या चौघांनी भावाकडून ५० लाख रुपये रोख व मिळकतीच्या ५० टक्के भागाची मागणी केली. या प्रकरणी भाऊ महाराज कृष्ण बिरमाणी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  अरुण धोंडू पाटील (रा.गंगापूर), महेश गंगाधर गुंजाळ, संतोष रामसिंग, विलास किसन मोरे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयितांनी संगनमत करत महाराज बिरमाणी यांच्या दिवंगत बहिणीचे नावे असलेल्या पाथर्डी शिवारातील सर्व्हे नं.२५९ या मिळकतीचा बनावट विकसन करारनामा तयार केला. या करारनाम्यासंदर्भात बिरमाणी यांना समजले असता त्यांनी विचारणा केली. त्यावेळी प्रकरण मिटवायचे असल्यास ५० लाख रुपये व मिळकतीचा ५० टक्के भाग खंडणीची मागणी संशयितांनी केली. रक्कम व मिळकत न दिल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देत विकसन करारनामाच्या आधारे खोट्या मजकुराचा दावा चौघांनी केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.

First Published on: September 1, 2019 8:23 PM
Exit mobile version