बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह पोलिस कर्मचारी जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह पोलिस कर्मचारी जखमी

उपचारासाठी दाखल जखमी शेतकरी. शेजारी पोलिस कर्मचारी.

कळवण तालुक्यातील बंधारपाडा येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी शेतकरी पिंट्या शंकर जगताप व पोलिस कर्मचारी बबनराव पाटोळे हे जखमी झाले. घटनास्थळी पोलिस वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.

तालुक्यातील बंधारपाडा येथे अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत असून, मंगळवारी दुपारी २ वाजता शेतात काम करत असलेल्या पिंट्या शंकर जगताप (२६) यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जबर जखमी केले. जगताप यांच्या हातासह मांडीला बिबट्याने जोरदार चावा घेतल्याने, त्याला जयदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टर नसल्याने परिचारिकेने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत गायकवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. बिथरलेला बिबट्या पोपट पवार यांच्या घरात शिरला असल्याने त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यांच्या कान, डोके व पाठीवर जखमा झाल्या असुन, त्यांच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First Published on: January 15, 2019 10:39 PM
Exit mobile version