अबब…! लष्करी अळीने केले तब्बल ४०० कोटी फस्त

अबब…! लष्करी अळीने केले तब्बल ४०० कोटी फस्त

लष्करी अळीने जिल्ह्यातील विविध पिकांवर हल्ला केला आहे.

यावर्षी अमेरिकन लष्करी अळीमुळे जिल्ह्यातील जवळपास २५ टक्के म्हणजे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका फस्त केला आहे. मक्याच्या पोंग्यापासून ते कणसापर्यंत लष्करी अळीने या पिकाचा पिच्छा पुरवला आहे. या अळीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे जवळपास ४०० कोटी फस्त केले आहेत.

मागील वर्षी २०१८ मध्ये मका पिकावर कर्नाटक राज्यात हल्ला केल्यानंतर तसेच हंगामाच्या अखेरीस मराठवाड्यात काही ठिकाणी लष्करी अळी आढळल्यानंतर कृषी विभागाने यावर्षी मे महिन्यापासूनच शेतकर्‍यांमध्ये जागृती करण्यास प्रारंभ केला. कृषी विभागाने जवळपास २०० पेक्षा अधिक शेतीशाळांच्या माध्यमातून लष्करी अळीवर प्रतिबंधक उपाययोजना करण्याबाबत प्रशिक्षण दिले. या शेतीशाळा व कीड नियंत्रणाबाबत समन्वय साधणार्‍या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार मका पेरलेल्या प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधावर पोहोचून कृषी कर्मचार्‍यांनी माहिती घेतली. कृषी विभागाने लष्करी अळीबाबतची माहिती वेळेवर उपलब्ध होण्यासाठी ऑनलाइन व्यवस्था सुरू केली होती. त्यानुसार लष्करी अळीवर नियंत्रण आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी व संशोधकांकडून उपाययोजना सुचवल्या जात होत्या.

या अळीवर नियंत्रण आणण्यासाठी किटकनाशकांपेक्षा जैविक उपायांना प्राधान्य दिले गेले. तरीही लष्करीअळींनी २५ टक्के मका पीक फस्त केल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या वर्षी जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर मकाची पेरणी झाली. त्यातील जवळपास ५६ हजार हेक्टर पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मका पिकाला मोठा फटका बसला असून शेतकर्‍यांचे ४०० कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बाजरीवरही प्रादुर्भाव

सुरुवातीला मका पिकावर हल्ला करणार्‍या लष्करी अळीने अखेरच्या टप्प्यात बाजरी पिकाकडे मोर्चा वळवला. मात्र, बाजरी पिक तुलनेने कमी दिवसांचे असल्याने तोपर्यंत बाजरीची सोंगणी अंतिम टप्प्यात होती. त्यामुळे यावर्षी बाजरीला फटका बसला नाही. पुढील वर्षी लष्करी अळीचा धोका टाळायचाा असेल, तर शेतकर्‍यांनी शेताच्या चहुबाजूने नेपियर गवताची लागवड करावी. लष्करी अळी नेपियर गवताकडे लवकर आकृष्ट होते व तेथेच तिचे जीवनचक्र संपुष्टात येते. यामुळे नेपियर गवत सापळा पीक म्हणूनही उपयोगात येऊ शकते, असे कृषी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यावर्षी लष्करी अळीला आटोक्यात आणण्यासाठी लावलेल्या सापळ्यात नर पतंग मोठ्याप्रमाणावर अडकले असल्याने पुढीलवर्षी लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होईल, असेही कृषी विभागाचे मत आहे.

दृष्टीक्षेपात मका पीक

एकूण मका पेरणी : २.२५ लाख हेक्टर
लष्करी अळीचा प्रादुर्भाव : ५६ हजार हेक्टर
मका उत्पादन (हेक्टरी) ३८.३८ क्विंटल
शेतकर्‍यांचे नुकसान : ४०० कोटी रुपये

First Published on: October 2, 2019 11:55 PM
Exit mobile version