कांदा चाळीतच गळफास घेत शेतकर्‍याची आत्महत्या

कांदा चाळीतच गळफास घेत शेतकर्‍याची आत्महत्या
बाळु अहिरराव

बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथील शेतकरी बाळू धनाजी अहिरराव (वय ४५) यांनी शेतातील कांदाचाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. दुष्काळामुळे हैराण तर सततची नापिकी व थकीत कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

दहिवड (ता. देवळा) येथील मूळ रहिवासी बाळू अहिरराव हे काही वर्षांपासून ताहराबाद येथे पत्नी, मुलासह वास्तव्याला होते. त्यांची गायरान शिवारातील चार ते पाच एकर शेतीत उदरनिर्वाह सुरू होता. विहिरींनी टाळ गाठला, पाण्याअभावी पिके कोरडी पडली. शेती पिकांना भाव नाही. अशा परिस्थितीशी झगडताना अहिरराव यांनी शेतीसाठी एचडीएफसी बँकेतून कर्ज घेतले होते. तसेच खासगी कर्ज घेतल्याने बँकेतील कर्जासह खासगी कर्जाचाही बोजा वाढला होता. थकीत कर्जाच्या परतफेडीसाठी बँकेकडून तगादा सुरू होता. यामुळे ते काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.

घरच्यांना बाळू अहिरराव दिसत नसल्याने शोधमोहीम सुरू केली असता शेतातीलाच कांदाचाळीत अहिरराव गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. बघून पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला. आसपासचे शेतकरी जमा झाले. अशोक खैरणार यांनी जायखेडा पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली जी. एल. भोये, आर. पी. गायकवाड यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. बाळू अहिरराव हे मनमिळावू व स्मितभाशी होते. त्यांच्या अकाली निधनाने दहिवडसह ताहराबाद व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

First Published on: April 10, 2019 11:35 PM
Exit mobile version