हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद

हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद

बागलाण तालुक्यातील नांदीन शिवारातील नंदकिशोर धोंडू पवार यांचा बळी घेऊन दहशत पसरवणारा बिबट्या अखेर पिंजर्‍यात कैद झाला. ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश कांबळे व कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली.

बिबट्याच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार झाल्याचे घटनास्थळ बागलाण तालुक्याच्या सीमारेषेला लागून साक्री तालुक्यात असतानादेखील ताहाराबाद वनपरिक्षेत्राचे नीलेश कांबळे यांनी आमदार दिलीप बोरसे यांनी केलेल्या सूचनेनुसार बागलाण हद्दीत तात्काळ तीन पिंजरे लावले. यामुळे पिसोळबारीलगत असलेल्या गणपती मंदिराजवळच्या पिंजर्‍यात रविवारी पहाटे पाच वाजता हा नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला.

नरभक्षक झालेला बिबट्या प्रचंड आक्रमक
नरभक्षक झालेला आणि पिंजर्‍यात कैद झालेला हा बिबट्या प्रचंड आक्रमक झालेला दिसला. त्याने अक्षरशः पिंजर्‍याच्या सागवान फळ्यादेखील तोडून टाकल्याने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड सावध झालेले दिसून आले.

छायाचित्र घेणे अशक्य
हा नरभक्षक बिबट्या इतका आक्रमक झाला होता की मनुष्य दिसताच तो अक्राळविक्राळ रूप धारण करत हल्ला करू पाहात होता. त्यामुळे वनविभागाने पिंजर्‍याभोवती अखेर ताडपत्री लावली.

First Published on: June 7, 2021 7:03 PM
Exit mobile version