करोनाबाधितावर उपचार करणाऱ्या जायखेड्याच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा

करोनाबाधितावर उपचार करणाऱ्या जायखेड्याच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा

जायखेडा – शासनाच्या कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करता कोरोनाबाधितावर उपचार केल्याप्रकरणी जायखेडा येथील डॉ. राहुल बागूल यांच्याविरुद्ध जायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. बागूल यांनी ज्या बाधितावर उपचार केले, काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला.

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील ३३ वर्षीय वाहनचालकाचा रिपोर्ट त्याच्या मृत्यूनंतर पॉझिॉटिव्ह आला होता. त्यामुळे परिसरात कोरोना संसर्ग वाढला. विशेष म्हणजे या कोरोनाबाधितावर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरसह त्यांच्या संपर्कातील ४६ व्यक्ती कोरोनाबाधित झाले होते. या कारणावरुन शुक्रवारी (दि. १९) वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश रामोळे यांनी पोलिसांत तक्रार केली होती. डॉ. बागूल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शासनाने कोरोनासंदर्भात मार्गदर्शक आदेश पारित केलेले असतानादेखील खासगी डॉक्टरने जायखेडा येथील एका ३३ वर्षीय करोना संसर्गबाधित रूग्णावर उपचार केले. तसेच, संबंधित रूग्णास परस्पर पुढील उपचारासाठी नामपूर येथील खासगी दवाखान्यात रवाना केले होते.

रुग्णावर उपचार करत असताना डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता बाळगली नाही. संबंधित रूग्णांच्या लक्षणांबाबत प्रशासनास कळविले नाही. त्याच्या संसर्गामुळे जायखेड्यासह मुंजवाड, जयपुर, वाडीपिसोळ, सोमपूर, ताहाराबाद व परिसरातील गावांत कोरोना संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याने जायखेडा पोलिसांनी भादंवि कलम २६, ९, २७०, राष्ट्रीय आपत्ती निवारण २००५ चे कलम ५१ ब कोविड-१९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कारवाईचा निवेदनाद्वारे निषेध

आरोग्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सामाजिक कार्यकर्ते संजय बच्छाव यांनी निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे. रुग्ण आल्यावर खासगी डॉक्टर घाबरून दवाखान्यातून त्यांना परतावून लावण्याचा प्रकार घडला होता. अशा परिस्थितीत डॉ. बागूल रुग्णांना तपासून योग्य औषधोपचार करत असताना वाहनचालकाच्या मृत्यूनंतर डॉ. बागूल यांना दोषी ठरवल्याचे निवेदनातून म्हटले आहे. कुठल्याही रुग्णाने डॉक्टरांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिल्यावरच डॉक्टर योग्य ते उपचार करत असतात. डॉ. बागूल यांनीही तेच केले. त्याच चुकीचे काहीही नव्हते, असेही त्यांनी निवेदनातून सांगितले.

First Published on: June 20, 2020 4:34 PM
Exit mobile version