अंबड औद्योगिक वसाहतीतील पावडर कोटिंग कंपनीला भीषण आग

अंबड औद्योगिक वसाहतीतील पावडर कोटिंग कंपनीला भीषण आग

नवीन नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील आर्ट इंटरप्राईजेस (बी ८४), दातीर मळा कंपनीत बुधवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पावडर कोटींगचे साहित्य आणि कंपनीतील माल जळून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट उठले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक महापालिकेच्या ४ अग्निशमन बंबांना कित्येक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

आर्ट इंटरप्राईजेस या कंपनीत पावडर कोटींगची कामे केली जातात. त्यासाठीच्या रासायनिक द्रव्याचा साठा कंपनीत असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. त्यातच एकापाठोपाठ एक अशा सहा सिलिंडर्सचे स्फोट होऊन ज्वलनशील पदार्थांनी आगीच्या ज्वालांसह आकाशात धुराचे लोट पसरले. या आगीने रौद्यरूप धारण केल्याने शेजारील श्लोक एंटरप्रायजेस (क्लिनिंग मटेरीयलची कंपनी), लान्सर अ‍ॅन्ड कंपनी (फायबर मोल्डींगची कंपनी) आणि स्प्रे पेंटींगची जे. पी. इंटरनॅशनल या कंपन्यांनाही झळ बसली.

तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अंबड आणि सातपूर विभागाच्या ४ बंबांसह अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांना आग विझवण्यात यश आले. या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

फायर ऑडिटला किती गांभीर्याने घेतले जाते?

अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने औद्यागिक वसाहतींमध्ये असलेल्या कंपन्यांना फायर ऑडिट करणे बंधनकारक असते. मात्र, किती कंपन्यांनी फायर ऑडिट केलेले आहे, हा संशोधनाचा विषय बनला आहे. अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. विविध वस्तूंचे उत्पादन याठिकाणी केले जाते. तसेच वर्कशॉप्स आहेत. येथील कंपन्यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. बुधवारी (दि.८) दातीर मळ्यातील कंपनीला मोठी आग लागल्यानंतर या आगीने भीषण रूप धारण केले. यावरून पुन्हा एकदा कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जात नाही, हे दुर्दैवी वास्तव समोर आले. औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी वाढीव बांधकामे केली आहेत. अनधिकृतपणे गाळेही बांधण्यात आले आहेत. काही कंपन्यांनी पुढे शेड टाकून अतिक्रमण केले आहे. कंपन्यांच्या परिसरात सामान ठेऊन अडचण केली जाते. धोकादायक रसायन किंवा प्लास्टिक असे ज्वलनशील धोकादायक पदार्थ सर्रास उघड्यावर ठेवले जातात. त्यामुळे आग लागण्याची घटना घडलीच, तर आग विझविताना अडचणी येतात. या सर्व बाबींचा विचार करून भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी कंपन्यांच्या फायर ऑडिटकडे महापालिका प्रशासनाने आता तरी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.

 

First Published on: June 9, 2022 2:33 PM
Exit mobile version