व्हेज अरोमालगत आग; स्थानिकांची धावपळ

व्हेज अरोमालगत आग; स्थानिकांची धावपळ

हॉटेल व्हेज अॅरोमालगत लागलेली आग.

गंगापूररोडवरील आनंदवलीनजीक असलेल्या चौकातील हॉटेल व्हेज अरोमा आणि निर्माणाधीन इमारत यादरम्यान गुरुवारी, २८ फेब्रुवारी सकाळी अचानक मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिकांनी तातडीने पाणी आणि वाळूचा मारा केल्याने काही मिनिटांत आग आटोक्यात आली.

गुरुवारी सकाळी पाऊणे अकरा वाजेच्या सुमारास आनंदवली चौकातील सिग्नललगत असलेल्या एका इमारतीमधून धुराचे मोठे लोट दिसू लागल्यानंतर, या ठिकाणच्या मजुरांसह स्थानिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. व्हॅज अरोमाच्या किचन आणि इमारत यांदरम्यान असलेल्या काही वस्तू आणि त्या पाठोपाठ इमारतीला शेवटच्या मजल्यापर्यंत बांधलेल्या बांबूंनी (पहाड) पेट घेतल्यानंतर आग भडकली. काही मजुरांनी प्रसंगावधान राखत, पहिल्या मजल्यावर जाऊन तेथून वाळूच्या गोण्या आगीच्या ठिकाणी खाली फेकल्या, तर बाजूच्या हॉटेलमधून नळीद्वारे पाणी मारण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या बंबानेही पाण्याचा मारा केल्याने १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आली. आग पाहण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. इमारतीलगत पेटविण्यात आलेल्या शेकोटीने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. आग वेळीच आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा जोरदार वारा आणि उंच गेलेल्या ज्वाला यामुळे संपूर्ण हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.

First Published on: February 28, 2019 1:36 PM
Exit mobile version