मनमाड येथे गिरणीला भीषण आग

मनमाड येथे गिरणीला भीषण आग

शहरातील नांदगाव मार्गावरील बुरकुलवाडी क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतील फ्लोअर मिलला लागलेली भीषण आग आणि तिला विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी व नागरिक .

मनमाड-नांदगांव मार्गावरील बुरकुलवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत एका फ्लोअर मिलला रविवारी (दि. २१) सकाळी भीषण आग लागली. पालिकेच्या अग्निशमन दलाचे एक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आग आगीचे स्वरूप पाहता एक बंबाने तिच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात असल्याचे पाहून मालेगाव येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने ३ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मिल जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनमाडपासून जवळ नांदगांव मार्गावर बुरकुलवाडी परिसरात औद्योगिक वसाहत असून त्यात अजित बेदमुथा यांचे फ्लोअर मिल असून आज सकाळी त्यातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकाना दिसताच त्यांनी बेदमुथा यांना त्याची माहिती दिली. आपल्या मिलला आग लागल्याचे कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंबाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भीषण असल्याने एक बंब अपुरा पडत होता. मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडे ३ बंब असून त्यापैकी एक बंब हा आज नांदगावला होणार्‍या शरद पवार यांच्या सभास्थळी, तर दुसरा बंब हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत येथे होणार्‍या सभेच्या ठिकाणी गेलेला आहे. त्यामुळे शहरात एकच बंब उरला होता.

हा बंब घटनास्थळी गेला. मात्र, आगीचे स्वरूप पाहता तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तो कमी पडत होता. त्यामुळे आग वाढत गेली. अखेर मालेगाव येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत मिल जळून खाक झाली होती. मनमाड नगर परिषदेचे तिन्ही बंब शहरात असते, आग लवकर आटोक्यात आली असती. मात्र, दोन बंब सभेच्या ठिकाणी गेल्यामुळे फ्लोअर मिलला लागलेली आग लवकर आटोक्यात आली नाही. त्यामुळे मिल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान रविवार असल्याने मजुरांना सुट्टी होती.

First Published on: April 21, 2019 6:08 PM
Exit mobile version