दुष्काळाचा पहिला बळी; पाणी भरण्यास गेलेल्या तरूणीचा मृत्यू

दुष्काळाचा पहिला बळी; पाणी भरण्यास गेलेल्या तरूणीचा मृत्यू

मृत नकुशी अहिरे (विहिरीचे छायाचित्र प्रातिनिधिक आहे.)

सारदे गावातील पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असून गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय टँकरद्वारे गावाची तहान भागवत आहे. अपुर्‍या पावसाने तालुक्यावर संकट घोंघावत असतानाच तालुक्यातील सारदे येथील विहिरीवर सकाळी दहा वाजेच्या सुमारास नकुशी अहिरे ही युवती पाणी भरण्यासाठी गेली असता तिचा पाय घसरला आणि थेट विहिरीत जाऊन पडली. तिने आरडाओरडा केला. मात्र, जवळपास कोणीही नसल्याने तिचा दुर्दैवी अंत झाला. घरी लवकर परतली नसल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता त्यांना विहिरीजवळ बादली हंडा आढळून आला. पोलीस पाटील स्वप्निल देवरे यांनी याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात कळविले. हवालदार दीपक भगत आणि पंकज खैरनार हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढण्यात आला.

शासनाच्या टँकरद्वारे गावाची तहान भागवत आहोत. मात्र ग्रामस्थांना मुबलक पाणी मिळत नसल्याने नाहक विहिरीवर जावे लागते. प्रलंबित हरणबारी धरणातून मुख्यमंत्री पेयजल योजना राबविण्यात यावी. – जयश्री देवरे, सरपंच सारदे

 

टँकरने होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने विहिरीवर पाणी भरायला जावे लागते. नकूशी सकाळी पाणी भरण्यासाठी गेली ती कायमचीच आमच्यातून निघून गेली. – सुमन आहिरे, नकुशीची चुलती

First Published on: January 20, 2019 2:41 PM
Exit mobile version