…आणि नाशिक पुन्हा झालं ‘गुलशनाबाद’!

…आणि नाशिक पुन्हा झालं ‘गुलशनाबाद’!

नाशिकमधील अनोखं फ्लॉवर पार्क!

गुलशनाबाद म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षापासून रंगीबेरंगी फुलांचा महोत्सव भरला आहे. इथं येणार्‍या प्रत्येकाला सेल्फी काढण्याचा मोह व्हावा, असा हा उत्सव आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देश आणि विदेशातील पर्यटक फुलांचा आनंद लुटण्यासाठी इथे गर्दी करताना दिसत आहेत. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच फ्लॉवर पार्क आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन आणि पुरातत्व विकास महामंडळाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर तथा खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते नाशिकमधील त्र्यंबकरोडवरील शभूम वॉटरपार्क परिसरात या शानदार पार्कचे उदघाटन झाले.

एक पार्क आणि ५० लाख फुलं!

सहा एकर जागेत हा फ्लॉवर पार्क उभारण्यात आला आहे. त्यात ५० लाख फुलांचा आनंद एकाच वेळी घेता येणार आहे. सध्या २ लाख फुलांची रोपे लावण्यात आलेली आहेत. मोर, कार, टुमदार घर, फ्लॉवर पॉट, हार्ट शेप आदी असंख्य प्रकारात फुलांच्या रोपांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे हा महोत्सव ‘सेल्फी महोत्सव’ म्हणून देखील ओळखला जातोय. रशिया, जपान, चीन, अमेरिका आणि जर्मनी या देशांमधून पर्यटक नाशिकमध्ये खास हा फ्लॉवर पार्क बघण्यासाठी आले असल्याचं या पार्कची कल्पना ज्यांची आहे ते जाधव पॅरेडाईज्डचे संचालक शशिकांत जाधव यांनी सांगितले.

फ्लॉवर पार्कची खासियत…

१) ६ एकर भव्य जागेवर शो
२) ५० लाख रंगबेरंगी फुले
३) २ लाख फुलांची रोपे
४) ३ लाखांपेक्षा अधिक फुलांनी सजवलेल्या पशु, पक्षी आणि बाहुल्यांच्या प्रतिकृती
५) दुबईच्या मिरॅकल गार्डननंतर भारतात प्रथमच अभिनव संकल्पनेतील फ्लॉवर शो
६) पोटपुजेसाठी स्वतंत्र खाऊगल्ली
७) फुलांची घसरगुंडी अन् फुलांचाच पाऊस!
८) दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत शो

First Published on: January 15, 2020 8:25 PM
Exit mobile version