मालेगाव तालुक्यातील निवासी वसतीगृहातील ११४ विद्यार्थी पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल

मालेगाव तालुक्यातील निवासी वसतीगृहातील ११४ विद्यार्थी पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल

मालेगाव तालुक्यातील अजंग वडेलच्या निवासी वसतीगृहातील ११४ विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ व उलट्याचा त्रास सुरु झाल्‍याने वडनेर-खाकुर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजंग येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मडियम स्कुलच्या निवासी वस्तीगृहात राहणार्‍या सुमारे ११४ विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ व उलट्याचा त्रास सुरु झाला आहे. त्यामुळे ९० विद्यार्थ्यांना वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात तर २४ विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी तीन विद्यार्थ्यांना अधिक उपचारार्थ मालेगाव येथील रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्रास कशामुळे झाला हे तपासण्यासाठी तालुकास्तरीय पथक शाळेत गेले असता, त्यांना सहकार्य न मिळाल्याने पथक खोळंबून राहिल्याची माहिती समोर येत आहे.

अजंग-नामपूर रस्त्यावर स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कुल आहे. या शाळेत गावातील मुलांसह सटाणा, कळवण, देवळा आदी तालुक्यातील एकुण ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर याच शिक्षण संस्थेच्या निवासी वसतीगृहात सुमारे २३० विद्यार्थी राहतात. रविवारी (दि. १८) रोजी शिक्षण संस्थेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत वेळेवर जेवन दिले जात नाही, स्वच्छता केली जात नाही यांसह अनेक तक्रारी पालकांकडे केल्या. त्यामुळे पालकांनी यासंदर्भात संस्थाचालकांकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे संस्थाचालक व पालकांमध्ये वाद निर्माण झाला.

कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांना जेवन देण्यात आले. त्यांनतर वस्तीगृहातील ११४ विद्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे ९० विद्यार्थ्यांना तत्काळ वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर २४ विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रुग्णालयात दाखल होताच आरोग्य यंत्रनेने त्यांच्यावर उपचार करण्यास प्रारंभ केला. रुग्णांवर डॉ. अमित पाटील, डॉ. तृप्ती मुळे, डॉ. वैशाली निकम, डॉ. फैजी, डॉ. हर्षीता कदम हे उपचार करीत आहेत.

वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची चर्चा गावात होताच, ग्रामस्थांनी वसतीगृह व प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच गर्दी केली आहे. प्राथमिक रुग्णालयातील तीन विद्यार्थ्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णांची संख्या बघता अतिरिक्त पथक रुग्णालयात तैनात ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. निकम यांनी दिली, तर तालुकास्तरीय पथकातील तालुका आरोग्य सहायक भटू शिंदे, नंदू कासार व जितेंद्र अहिरराव हे रुग्णालयात तळ ठोकून आहेत. विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास कशामुळे झाला. त्यासंदर्भातील आहाराचे नमूने घेण्यासाठी डॉ. अमित पाटील, तालुका आरोग्य सहायक भटू शिंदे, आरोग्यसेवक विदूर अहिरे, रामू पवार, बागूल आदींचे एक पथक शाळेत पाठविण्यात आले आहे.

परंतू त्या पथकाला संस्थाचालकांकडून सहकार्य मिळत नसल्याने ते शाळेच्या बाहेर ताटकळत उभे असल्याचे सूत्रांनी सांगितले. यांसदर्भात संस्थाचालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

आज दुपारी पालक मेळावा असल्याने मी शालेत मुलाला भेटायला गेलो तर मुलागा अंग खाजत होता. तसेच पोट दुखवत होता, तसेच मळमळ इतर दिसून आला सदर शाळेत स्वच्छता नाही विद्यार्थांच्या जीवाशी खेळ चालू आहे.
– सोमनाथ गायकवाड, पालक  साजोले, (सुरगाणा).

आज सायंकाळी तीन वाजता अजंग येथील स्वामी विवेकांनद इंग्लिश मेडीयम आदीवासी वसतिगृहातील 89 विध्यार्थीना विविध रोगाची लागण झाल्याचा प्रकार घडला उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पालक घेऊन आले सदर मुलांना मळमळ, पोट दुखणे तसेच शरीराला खरूज सारखा प्रकार घडलेला आहे संबंधित मुलांवर उपचार सुरु आहेत तसेच प्रकरणाचे कारण शोधण्यासाठी सदर शाळेवर काही नमुने आणले आहेत तपासणी करून सदर रोगाचे लागण कळेल. – डॉ. अमित पाटील

First Published on: August 18, 2019 11:55 PM
Exit mobile version