वाहनधारकांच्या हौसेचे मोल चार कोटी

वाहनधारकांच्या हौसेचे मोल चार कोटी

प्रातिनिधीक फोटो

सुशांत किर्वे, नाशिक

वाहन खरेदी केल्यानंतर वाहनमालक आकर्षक क्रमांक मिळण्यासाठी धडपड सुरू करतात. मनाप्रमाणे क्रमांक मिळावा, यासाठी वाहनमालक कितीही पैसे खर्च करतात. मोबाइलपासून ते गाड्यांपर्यंत आपल्या पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी अनेक हौशी वाहनधारकांची धडपड सुरू असते. त्यासाठी आरटीओकडे लगेचच अर्ज केला जातो.

जन्मतारीख वा अन्य काही सुखद आठवणी किंवा जुन्या वाहनाचा भाग्यवान क्रमांक, आवडता अंक अशा अनेक कारणांमुळे चॉइस क्रमांक घेण्यासाठी वाहनधारकांची धडपड सुरू असते. भाग्यवान क्रमांक मिळवण्यासाठी हजारो, लाखो रुपये किंमत मोजणारी हौशी लोकांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत आहे. पसंती क्रमांकाच्या माध्यमातून इतरांपेक्षा वेगळेपणा वा स्वतःची विशिष्ट आवड, अशा कारणांमुळे पसंती क्रमांकांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. चारचाकी वाहनधारकांसह दुचाकी मालकदेखील आजकाल पसंती क्रमांकाकडे लक्ष ठेवून असतात. आवडता क्रमांक घेण्यासाठी सुरू असलेली वाहनधारकाची धावपळ आरटीओच्या शासकीय महसूल गोळा करण्याच्या उद्दिष्टास हातभार लावत आहे. त्यामुळे अवघ्या एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ या महिन्यांत ५ हजार ६४० वाहनांच्या चॉइस क्रमांकाच्या माध्यामतून ४ कोटी १० लाखांचा महसूल आरटीओ विभागात जमा झाला आहे.

या क्रमांकांना सर्वाधिक मागणी

सर्वाधिक मागणी असलेल्या क्रमांकामध्येे ०००१ हा क्रमांक असून हा क्रमांक घेण्यासाठी वाहनचालकांची धडपड सुरू असते. ०००१ हा एक आकडी नंबर घेण्यासाठी वाहनधारकास तब्बल तीन ते चार लाख रुपये मोजावे लागतात. पसंती क्रमांकात दुसर्‍या स्थानावर असलेले ०००९, ००९९, ०७८६, ०९९९, ९९९९ हे क्रमांक देखील जवळपास दीड लाख रुपयांना उपलब्ध आहेत. ०००२, ०००३, ०२०२, १०१०, १२१३, ६७६७ हे क्रमांक ५० हजार रुपयांपर्यंत मिळू शकतात. याव्यतिरिक्त आणखी काही क्रमांकांना वाहनचालकांकडून विशेष पसंती दिली जाते. यात १००८, ९९९७ तसेच ७००० या क्रमांकाचा समावेश होतो. कमी ऐपत असणार्‍या वाहनधारकांसाठीही पाच हजार रुपयांपासून पसंती क्रमांक उपलब्ध असून, अशा जवळपास हजारो वाहनधारकांच्या माध्यमातून लाखो रूपयांचा महसूल गोळा झाला आहे.

ऑनलाइन दरपत्रक

प्रत्येक नवीन सिरीजमध्ये ०००१ पासून पुढे गणले जाणारे क्रमांक उपलब्ध असतात. आपला आवडता क्रमांक मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात रीतसर शुल्क भरून वाहनचालक हे क्रमांक घेऊ शकतात. दलालांमार्फत वाहनधारकांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी कार्यालयाच्यावतीने सर्व पसंती क्रमांक व त्यांच्या किमती दर्शविणारे दरपत्रक ऑनलाइन जाहीर केले आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्जदार समोर येतात, तेव्हा या क्रमाकांचा लिलाव केला जातो.

आवश्यक कागदपत्र

नवीन मालिकेतील कोणताही क्रमांक ठराविक शुल्क भरून आरक्षित करण्यात येत आहे. यासाठी संबंधित चालकांचे फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती असणे आवश्यक आहे.

First Published on: January 24, 2019 1:43 PM
Exit mobile version