जमिनीतून सोने काढण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून एक लाखांना गंडा

जमिनीतून सोने काढण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून एक लाखांना गंडा

जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत महंताने एकाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील भोंदूबाबाविरुद्ध जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

याप्रकरणी पुखराज चौधरी यांनी सातपूर पोलिसांत तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी महंत गणेश आनंदगिरी महाराज ऊर्फ गणेश जयराम जगताप (रा. बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्ट, इंदिरानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत गणेश आनंदगिरी महाराज ऊर्फ गणेश जयराम जगताप हे बडे बाबा मच्छिंद्रनाथ ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. आश्रमाच्या कामासाठी पुखराज चौधरी यांच्याकडून महंत गणेश आनंदगिरी महाराज यांनी रोख व आरटीजीएसव्दारे एकूण एक लाख १२ हजार ६०० रूपये घेतले. त्याबदल्यात जमिनीतून सोने काढून देतो, असे महंत गणेश आनंदगिरी महाराज यांनी सांगितले. प्रत्यक्षात सोने मिळाले नाही आणि दिलेली रक्कमही परत मिळाली नाही. त्यातून महाराजांनी फसवणूक केल्याचे चौधरी यांचे लक्षात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. काळे करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी जादूटोना विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केली आहे. त्या भोंदूबाबाचे कारनामे समाजापुढे आणावेत. संबंधित महतांनी कोणाला फसवले आहे, याचिही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंनिसचे डॉ.ठकसेन गोराने, महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, सुशिलकुमार इंदवे, डॉ.सुदेश घोडेराव, अ‍ॅड. समीर शिंदे आदींनी केली आहे.

First Published on: September 10, 2020 9:17 PM
Exit mobile version