फेसबुकवर करते फ्रेंडशिप, मग होतो ‘हनी ट्रॅप’

फेसबुकवर करते फ्रेंडशिप, मग होतो ‘हनी ट्रॅप’

बबलीच्या फेसबुक अकाऊंट फ्रेंड लिस्टमध्ये अनेक पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे तिची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यावर कुणीही सहजपणे ती स्वीकारते. फेसबुकवर चॅटिंग सुरू असतानाच ती काही दिवसातच व्हॉट्स अ‍ॅपचा नंबर मागते. त्यानंतर सुरू होतो हनी ट्रॅप.. व्हॉट्स अ‍ॅप चॅटिंगपासून व्हीडिओ कॉलपर्यंत सगळेच काही या काळात होते. प्रेमाचे जाळे टाकल्यावर मासा गळाला अडकतो आणि काही दिवसातच अडचणी दाखवून पैसे मागवले जातात. फसवणूक झाल्यावर लोकलज्जेस्तव कुणी तक्रार करण्यास पुढे धजावत नाही. अशा प्रकरणात राज्यभरातील काही पोलीस अधिकारीही अडकल्याचा संशय व्यक्त होत आहे.

शासकीय राजमुद्रेचा गैरवापर करणार्‍या कथित नेहा मोहन जोशीचे सुरस किस्से दररोज समोर येत आहेत. या नेहा जोशीचे फेसबुक अकाऊंट आजही चालू आहे. त्याचप्रमाणे ती आजही काही लोकांशी चॅटिंग करीत असल्याचे कळते. ‘आपलं महानगर’ने याबाबत भांडाफोड केल्यानंतर काहींनी आमच्याशी संपर्क साधत आपबिती सुनावली. आपली ज्याप्रमाणे फसवणूक झाली त्याप्रमाणे अन्य कुणाची होऊ नये हा यामागचा त्यांचा हेतू होता. याच निमित्ताने पोलीस अधिकार्‍यांना फसवल्याची काही प्रकरणेही पुढे आलीत. मात्र, समाजात बदनामी होऊ नये म्हणून अद्याप कुणी पुढे आलेले नाही.

प्रकरण १- एका पोलीस उपनिरीक्षकाशी या बबलीने फेसबुकवर ओळख वाढवली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. इतकेच नाही तर लग्नाच्या आणाभाकाही घेण्यात आल्यात. नाशिक सिव्हिलमधील ‘क्लास वन’ अधिकारी आपल्याबरोबर लग्नास तयार असल्याने संबंधित उपनिरीक्षकाने आपल्या घरीही ही गोष्ट सांगितली. त्यानुसार घरच्यांनी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. मात्र त्यातील एका नातेवाईकाने जिल्हा रुग्णालयातील एका अधिकार्‍याशी संपर्क साधत मुलीविषयी चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की अशा नावाची कुणीही क्लासवन अधिकारी सिव्हिलमध्ये कार्यरत नाही. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच संबंधितांनी तोंड गप्प ठेवणे पसंत केले. अर्थातच समाजात बदनामी नको, म्हणून ही काळजी घेतलेली दिसते.

प्रकरण २- पोलीस अकादमीत प्रशिक्षणासाठी आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकालाही या बबलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात अडकवले होते. हा तरुण तिला भेटण्यासाठी रविवारच्या सुटीच्या दिवशी जाणारही होता. मात्र त्याने आपल्या एका मित्राला ही बाब सांगितली. योगायोगाने हा मित्रही बबलीच्या जाळ्यात कधीकाळी अडकला होता. त्याने स्वअनुभव कथन केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तिच्या फेसबुकवरून ‘अनफ्रेंड’ झाला.

प्रकरण ३- एमपीएससीची परीक्षा देऊन पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अन्य एका तरुणालाही बबलीने फसवले होते. या तरुणाचे पैसे ती परत देण्यास नकार देत होती. त्यामुळे त्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. त्यावेळी ‘बंटी’ने अर्थात एका अनोळखी पुरुषाने त्याला धमकवणारा फोनही केला. परंतु तरुणाने न घाबरता त्यालाही पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. अखेर तिसर्‍याच व्यक्तीकडून पैसे परत करण्यात आले.

प्रकरण ४- बबलीने फेसबुकवर आपल्याला २६ जानेवारी २०२० ला राष्ट्रपतीपदक मिळणार असल्याचे जाहीर केले. यासाठी तिने शासकीय बनावट पत्र देखील पोस्ट केले होते. एका फसवलेल्या तरुणाने आपल्या पैशांचा तगादा लावल्यानंतर बबलीने दुसर्‍याच एका तरुणाला प्रेमाच्या मोहपाशात अडकवत त्याला टोपी घातली. राष्ट्रपतीपदक घेण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचे आहे. परंतु विमानाचे तिकीट तातडीने मिळणे मुश्किल झाले आहे. नगरमधील एक व्यक्ती असे तिकीट काढून देत आहे. त्याच्यापर्यंत पाच हजार रुपये रोख रक्कम पोहचव आणि ही रक्कम मी तुझ्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करते असे सांगत बबलीने या व्यक्तीलाही वेड्यात काढले. हा संमोहित झालेला बिचारा मुकाट्याने पाच हजार रुपये संबंधित तरुणाला देऊन मोकळा झाला. हे पैसे त्याला अद्याप परत मिळाले नसल्याचे कळते.

First Published on: January 1, 2020 3:24 AM
Exit mobile version