प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर संपूर्णपणे बंदी आणा..

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर संपूर्णपणे बंदी आणा..

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर संपूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी मनोवेध डेव्हलपमेंट फाऊंडेशनने महापौर रंजना भानसी व आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देऊन केली. मूर्तिदानात मिळणार्‍या सगळ्या शाडूमातीच्या मूर्ती मनोवेध संस्थेला दिल्यास मातीचा पुनर्वापर आम्ही करून पर्यावरणाचे मोठे नुकसान आपण टाळू शकतो, असेही निवेदनात म्हटले आहे.

बाजारातल्या बहुतांश मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या असतात. ज्यावर हमखास अत्यंत विषारी पारा, शिसे, डिस्टेंपर असते. या मूर्ती विसर्जनानंतर विरघळत नाही. त्या विसर्जनानंतर काही काळात त्या भंगतात, फुटतात किंवा तुटतात. त्यांचा पाण्यातील जलचर वनस्पती व पाणी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, पाणी प्रदूषित होते. मूर्तीदान या संकल्पनेत देखील अशा मूर्तींच्या निचर्‍याच्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर मनोवेध संस्थेने निवेदन देऊन महापालिका प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जरी न वापरात असलेल्या विहिरी, तलाव इथे पुनर्विसर्जित केल्या तरी अतिविषारी रंग घटक पाण्याच्या माध्यमातून भूमीअंतर्गत जलस्रोतात मिसळून मानव, प्राणी, जमीन झाडे यांचे अपरिमित नुकसान करीत असतात. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर ,निर्मिती आणि विक्री यावर संपूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी मागणी फाऊंडेशनचे अमोल कुलकर्णी, प्रशांत बेळगावकर, वृषाली कुलकर्णी, हेमंत भावसार आदींनी केली आहे.

अंकुर गणेश, श्रृष्टीप्रसाद

अंकुर गणेश व श्रुष्टीप्रसाद सारख्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचा वापर व माहिती जनमानसात होण्यास्तव शासकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मनोवेध डेव्हलोपमेंट फौंडेशन ही संस्था गेल्या पंधरा वर्षांपासून ‘श्रुष्टी गणेश चळवळ’ पर्यावरणीय गणेशउत्सवाची राबवित असते. त्यात पर्यावरण पूरक गणेश उत्सवाबाबत प्रसार, प्रचार प्रबोधन मोठ्या प्रमाणात करत असतेच,त्याच बरोबर पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती साठी संशोधन व निर्मिती देखील करीत असते हे कार्य कोणत्याही आर्थिक लाभाच्या अपेक्षेने नव्हे तर पर्यावरण रक्षणाच्या हेतूने होत असते. गेल्या चार वर्षांपासून संस्थेने अंकुर गणेश ही ११० टक्के पयावरण पूरक मूर्तीची निर्मिती केली आहे. या मूर्ती महाराष्ट्रातील काळ्या किंवा लाल मातीच्या असून मूर्तींमध्ये फुलझाडांच्या बिया असतात. मूर्तीचे विसर्जन झाडे लावायच्या कुंडीत केल्यानंतर मूर्तीतील माती कुंडीतल्या मातीत मिसळून जाते व झाड उगवते. मूर्तीना १०० पर्यावरणीय रंग दिले असल्याने कोणतेच प्रदूषण होत नाही. विसर्जनानंतरही पर्यावरणाला पोषक ठरणार्‍या अंकुर गणेश उपक्रमाचा शासन वा महापालिकेच्या स्तरावर प्रसार, प्रचार व्हावा अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शाडू मातीही पर्यावरण पूरक नाहीच

शाडू मातीच्या मूर्तींवरील रासायनिक व विषारी रंग यावर बंदी घालून, शाडूमातीच्या मूर्तींच्या मातीचा पुनर्वापर करणारी यंत्रणा राबवावी. वास्तविक, शाडूमातीच्या मूर्ती देखील पूर्णपणे पर्यावर पूरक नाहीत. शाडू माती दुसर्‍या प्रांतातून आणली जाते. ती महाराष्ट्रातील मातील मिसळू शकत नाही व तिच्यात अंकुरण क्षमता देखील नसते. त्यामुळे इतर प्रदेशातील माती आपल्या नैसर्गिक स्थानांवर काही टनांनी येऊन पडू लागल्यास पर्यावरणाच्या आणि त्या मातीच्या निचर्‍याच्या नवीन समस्येला भविष्यात सामोरे लागणार आहे.

First Published on: August 25, 2019 5:11 PM
Exit mobile version