घोटी त्र्यंबक मार्ग होणार टुरिझम डेस्टिनेशन

घोटी त्र्यंबक मार्ग होणार टुरिझम डेस्टिनेशन

घोटी त्र्यंबक मार्ग होणार टुरिझम डेस्टिनेशन

नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने विविध योजना राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता घोटी ते त्र्यंबकेश्वर दरम्यानचा २० किलोमीटरचा मार्ग टूरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने पर्यटन सचिव विनिता सिंघल यांनी आज या भागाची पाहणी केली. याबाबतचा अहवाल तयार करण्यात येऊन विभागाला सादर करण्यात येणार आहे.

राज्यात अन्य कुठेच नसेल एवढे पर्यटन वाढीची क्षमता नाशिकमध्ये आहे. तीर्थाटन ते टुरिझम डेस्टिनेशन, असा नाशिकचा प्रवास आश्चर्यचकित करणारा तसेच पर्यटकांच्या अपेक्षा उंचावणाराही आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यटन योजनांमध्ये रामायण सर्किट, प्रसाद योजनेत नाशिकचा सामावेशही करण्यात आला आहे. त्यामुळे कुंभनगरी, बारा ज्योर्तीलिंगापैकी एक असलेल्या नाशिकचा पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. याशिवाय इगतपुरी तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटायला पर्यटक गर्दी करत असतात. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातही अनेक पर्यटन ठिकाणे आहेत. तीर्थनगरी ते पर्यटन डेस्टिनेशन म्हणून नाशिकचा विकास करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने घोटी ते त्र्यंबकेश्वर २० किलोमीटर मार्गाचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्यात येणार आहे. यात या परिसरातील शेतकर्‍यांनाही सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे. त्यामुुळे अ‍ॅग्रो टुरिझमचाही विकास करणे सहज शक्य होईल. तसेच या भागात सरकारी भूखंडांचा शोध घेऊन येथे रिसॉर्ट, हाट बाजाराच्या धर्तीवर केंद्र, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस आदींचा विकास करण्याचे प्रस्तावित आहे. आज पर्यटन सचिव विनिता सिंघल यांनी आवली दुमाला ते पहिने या भागाला भेट दिली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, कार्यकारी अभियंता विनय वावधने, प्रांताधिकारी राहुल पाटील, इगतपुरी तहसीलदार वंदना खरमाळे , त्र्यंबकेश्वर तहसीलदार दीपक गिरासे, अप्पर वैतरणा अभियंता वडनेरे, वनखात्याचे अधिकारी आदी उपस्थित होते.

पर्यटन केंद्र विकसित करण्याचे विचाराधीन

नैसर्गिक सौंदर्यसंपन्न जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर असंख्य नैसर्गिक ठिकाणे आहेत. सुपीक जमिनी, शेतीसाठी पोषक वातावरण यांमुळे कृषी पर्यटन वाढीला येथे मोठी संधी आहे. नाशिक जिल्ह्याला २७ धरणांनी समृद्ध केले आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला मोठा वाव आहे. याच अनुषंगाने या मार्गावर पर्यटन केंद्र विकसित करण्याचे विचाराधीन असून त्यादृष्टीने आज पाहणी करण्यात आली. – नितीन मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, पर्यटन विभाग.

First Published on: July 24, 2019 11:56 PM
Exit mobile version