विधानपरिषदेसाठी पानगव्हाणेंच्या हालचाली

विधानपरिषदेसाठी पानगव्हाणेंच्या हालचाली

नाशिक : विधानपरिषदेच्या एका जागेवरुन काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असताना आता जिल्हा काँग्रेसही माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्यासाठी सरसावली आहे. पक्षाला बळकटी मिळावी म्हणून विधानपरिषदेत नाशिकला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाला अवघी एक जागा मिळाली. त्यामुळे स्थानिक काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. या परिस्थितीत, काँग्रेसला जिल्हयात नव्याने संजीवनी देण्यासाठी विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व देण्याची आवश्यकता आहे. पक्षाने ही संधी दिल्यास पक्ष बळकट होण्यास मदत मिळेल. यासाठी विधानपरिषदेवर पक्षाने माजी जिल्हाध्यक्ष पानगव्हाणे यांना उमेदवारी द्यावी. पानगव्हाणे यांनी 18 वर्ष आपल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पक्षाची तालुका पातळीवरील, जिल्हा पातळीवरील, राज्य पातळीवरील विविध शिबिरे घेत कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. त्यांच्या शिबिरांची प्रदेश व दिल्ली काँग्रेसने दखल घेतली. भाजप केंद्र सरकारच्या विरोधात विविध मोर्चे, आंदोलने देखील केली. यासाठी पक्षामध्ये प्रामाणिक काम करणार्‍याला निष्ठावान पानगव्हाणे यांना संधी द्यावी, अशी मागणी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी आमदार शिरीष कोतवाल, अ‍ॅड. अनिल आहेर, काशीनाथ बहिरम, नाशिक बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे, रमेश कहांडोळे, भारत टाकेकर, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, दिगंबर गिते, शैलेश पवार, सुनील आव्हाड, रतन जाधव, ज्ञानेश्वर काळे यांसह 15 तालुकाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याकडे केली आहे.

First Published on: May 6, 2020 6:48 PM
Exit mobile version