आज प्रकट दिन, तरीही पालिकेच्या उदासीनतेने गोदावरीच्या नशिबी दुर्दशेचा फेरा

आज प्रकट दिन, तरीही पालिकेच्या उदासीनतेने गोदावरीच्या नशिबी दुर्दशेचा फेरा

प्राचीन काळापासून धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या गोदावरीला पडलेला प्रदूषणाचा विळखा गोदावरी प्रकट दिनाच्या पूर्वसंध्येलादेखील कायम होता. महापालिका प्रशासनाकडून निदान या दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविले जाणे अपेक्षित असताना, याठिकाणीही पालिकेची उदासीनता आणि गोदावरीच्या नशिबी उपेक्षा दिसून आली.

औद्योगिक कारखान्यांमधून बाहेर पडणारे रासायनिक पाणी, मलजल, ड्रेनेज, निर्माल्याचे खच आणि शेवाळाचा थर अशा समस्यांच्या गर्तेत अडकल्याने धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची गेल्या काही वर्षांपासून मोठी दुर्दशा झाली आहे. कधी खुद्द भाविकांची मानसिकता, तर कधी महापालिकेची अनास्था अशा कारणांमुळे गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर आला आहे. शहरातून पुढे प्रवाहीत झालेल्या गोदावरीच्या पात्रात झालेल्या काँक्रिटीकरणामुळेच प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केल्याचे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले. गोदावरीला प्रदुषणमुक्त करण्यासाठी त्यांनी अनेकदा न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. मात्र, त्यानंतरही महापालिकेकडून कुठली ठोस उपाययोजना होत नसल्याच्या पर्यावरणप्रेमींच्या तक्रारी आहेत.

काँक्रिटमुक्तीसाठी नाशिककरांनो एकजूट करा

गोदावरी प्रदूषणाला केवळ गोदावरी पात्रातील काँक्रिटीकरणच जबाबदार आहे. त्यामुळे हे काँक्रिटीकरण दूर करत पात्रातील प्राचीन १७ कुंड आणि जिवंत जलस्त्रोत पुनर्जिवित करण्याची मागणी गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या देवांग जानी यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयापासून ते शासन-प्रशासनापर्यंत सर्वांकडे पाठपुरावा केला. स्मार्ट सिटीतील गोदा प्रोजेक्टच्या अंतिम डीपीआरमध्येही कामाचा समावेश झाला. मात्र, पुढे काहीही कार्यवाही होत नसल्याचे जानी यांनी सांगितले. गोदापात्र काँक्रिटीकरणमुक्त होत नाही तोपर्यंत गोदाप्रेमी दीपोत्सव साजरा करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. गोदावरीचा वाढदिवस अर्थात प्रगट दिनानिमित्त नाशिककरांनी एकजूटीने पुढाकार घेत काँक्रिटमुक्त गोदावरीसाठी संकल्प सोडावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुरोहित संघातर्फे महाआरती

गोदावरीच्या प्रगट दिनानिमित्त शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) पुरोहित संघाच्या वतीने पंचवटीतील रामकुंड परिसरात महाआरती केली जाणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी केले.

First Published on: February 14, 2019 11:47 PM
Exit mobile version