नाशिककरांना खुशखबर : हॉटेल, बार रात्री ९ पर्यंत तर दुकाने ८ पर्यंत खुली राहणार

नाशिककरांना खुशखबर :  हॉटेल, बार रात्री ९ पर्यंत तर दुकाने ८ पर्यंत खुली राहणार

कमला मिलमधील सर्व हॉटेल्सची होणार तपासणी

शहरातील सर्व दुकाने आता रात्री ८ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसेच हॉटेल, बार, रेस्टॉरंटसाठी रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यभरातील हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. नियम, अटींच्या अधीन राहून हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. नाशिकमध्ये मात्र प्रशासनाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी परवानगी दिल्याने ही वेळ ग्राहक आणि हॉटेल, बार चालकांसाठी गैरसोयीची ठरू लागली. साधारणपणे नागरिक ७ वाजेनंतरच हॉटेलमध्ये जातात तर मद्य शौकिनांची पावलेही रात्रीच बारकडे वळतात. त्यामुळे या वेळा वाढवून देण्याबाबतची मागणी हॉटेल चालकांनी केली होती. अखेर आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हॉटेल्ससाठी सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर बार सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शहरातील इतर व्यावसायिकांनाही दुकाने सुरू ठेवण्यास वेळ वाढवून देण्यात आली आहे. मेडीकल, दवाखाने आदि अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायास सायंकाळी ७ वाजेपर्यंतची मर्यादा कायम ठेवण्यात आली होती. यामुळे येऊ घातलेल्या सणासुदीच्या काळात शहरातील सर्व दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

… तर दुकानदारांवर कारवाई
दुकाने खुली ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आली असली तरी, दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणेही आवश्यक आहे. दुकानदारांनीही ग्राहकांना मास्क असल्याशिवाय खरेदी करू देउ नये ही त्यांचीही जबाबदारी आहे त्यामुळे जर या नियमांचे उल्लंघन होत असल्यास यास दुकानदारांना जबाबदार धरले जाईल व कारवाई केली जाईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

अशा असतील वेळा
हॉटेल्स, रेस्टॉरंट    सकाळी ८ ते रात्री ९
बार, परमीट रूम   सकाळी ११ ते रात्री ९
इतर दुकाने           रात्री ८ वाजेपर्यंत

First Published on: October 10, 2020 3:39 PM
Exit mobile version