नाशिककरांना दिलासा : म्युकरमायकोसिसचे रुग्ण घटले

नाशिककरांना दिलासा : म्युकरमायकोसिसचे रुग्ण घटले

कोरोना ओसरत असताना गेल्या मे-जून महिन्यात कोरोना पश्चात म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी आरोग्य विभागाने उपचार आणि नियोजन प्रणाली राबवल्यामुळे रुग्णसंख्येमध्ये नियंत्रणात आली आहे. आता जिल्ह्यात अवघे १८२ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली म्युकरमायकोसिसाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी योग्य नियोजन प्रणाली राबवण्यात आली आहे. जिल्ह्यात मे महिन्यात अचानक म्युकमायकोसिस रुग्ण संख्येमध्ये वाढ लक्षात घेऊन त्वरीत योग्य नियोजन प्रणाली स्थापित करून म्युकरमायकोसिस जिल्हा समन्वयक तथा कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी कान, नाक, घसा तज्ज्ञ, दंत शल्यविशारद, नेत्र शल्यविशारद व दोन्ही वैद्यकिय महाविद्यालये एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय, इगतपुरी व डॉ. वसंत पवार वैद्यकिय महाविद्यालय, आडगाव यांच्याशी समन्वय साधून रुग्णांना आवश्यक शस्त्रक्रिया व्यवस्था करून पुढील लागणारे अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे योग्य पुरवठा व वितरण व्यवस्था नियोजन करण्यात यश मिळवले.

म्युकरमायकोसिसची मे महिन्यात सुरुवात झाल्याने रुग्ण संख्या वाढत गेली. सुमारे ४०० ते ४५० पर्यंत रुग्णसंख्या वाढत गेल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीती निर्माण झाली. तसेच रुग्णांना त्वरीत आवश्यक शस्त्रक्रिया व्यवस्था करून पुढील लागणारी अ‍ॅम्फोटेरेसिन बीची उपलब्धता वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रूग्णालयांना उपलब्ध करून देण्यात आली. मे-जून महिन्यात झालेली वाढ आता नियंत्रणात आणली असून, दिवसातून फक्त १ ते २ संशयित रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत ४१५ रुग्णांवर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. १२ हजारपेक्षा जास्त अ‍ॅम्फोटेरेसिन बीची पुरवण्यात आलेले आहेत. नाशिक महापालिकाअंतर्गत येणार्‍या खासगी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत अंदाजे १०० रुग्णांना मोफत अ‍ॅम्फोटेरेसिन बीची उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक वाढले आहे.

या ठिकाणी होणार रुग्णांवर उपचार

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांना विनाविलंब उपचार वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य व पंतप्रधान जनकल्याण योजनेअंतर्गत राबविली जात आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचारासाठी रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. शहरी भागासाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, बिटको रुग्णालय व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगाव येथे उपचार केले जात आहेत. तर ग्रामीण भागासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय आणि एस. एम. बी. टी. वैद्यकीय महाविद्यालय, धामणगाव (ता. इगतपुरी) येथे मोफत उपचार केले जात आहेत. त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरातयांच्याकडे सादर केला जातो आहे.

 

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आणि मधुमेह रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवल्यास म्युकरमायकोसिस आजार टाळता येऊ शकेल. लक्षणे दिसून येताच तत्काळ उपचार करुन घ्या.
                                      – डॉ. संजय गांगुर्डे, जिल्हा समन्वयक,जिल्हा रुग्णालय, नाशिक

First Published on: June 29, 2021 3:00 PM
Exit mobile version