हॅण्डग्लोजच्या वासावरुन ‘गुगल’ने शोधला चोरटा

हॅण्डग्लोजच्या वासावरुन ‘गुगल’ने शोधला चोरटा

घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्यास नाशिक शहर पोलीस दलाच्या श्वान पथकातील डॉबरमॅन प्रजातीच्या गुगलला प्राचारण करण्यात आले. अवघ्या काही तासांत कापडी काळ्या रंगाच्या हॅण्डग्लोजचा वास घेउन गुगलने चोरट्याला शोधून काढत त्याच्यावर भुंकला. पोलिसांनी चोरट्यास ताब्यात घेतले आहे. संशयित अनिल कोंडीराम काळे (रा. इंदिरा गांधी वसाहत, अंबड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

सिडकोतील कुलस्वामिनी, वृंदावण कॉलनी येथील संतोष जोशी कुटुंबियांसह ३ सप्टेंबर रोजी सकाळी घराचे दरवाजांना कुलूप लावून औरंगाबादमध्ये गेले होते. ते १२ सप्टेंबर रोजी परत नाशिकमध्ये आले असता त्यांना घरातील बॅडरुममधील कपाट उघडे दिसले. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त व तिजोरीतील दागिने लंपास झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, त्यांच्या घराच्या कोणताही दरवाजा उघडा दिसून आला. दरवाज्यांचे कुलूपसुद्धा व्यवस्थित होते. त्यांना देवघरातील खिडकीचे गज वाकलेला दिसला. खिडकीतून चोरटे घरात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातून घरात चोरी झाल्याचे जोशी यांना समजले. नेकलेस, मंगळसूत्र, चैन असा एकूण सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी संतोष गोपाळ जोशी यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

घटनास्थळी डॉग हॅण्डलर पोलीस गणेश कोंडे गुगलला घेऊन आले. त्यांनी गुगलला घरात फिरवले. त्यावेळी घराच्या खिडकीत कापडी काळ्या रंगाचा हॅण्डग्लोज पोलिसांनी दिसला. पोलिसांनी जोशीसह कुटुंबियांना हॅण्डग्लोजबाबत विचारणा केली असता तो घरातील कोणाचाच नसल्याचे उघडकीस आले. गुगलने तो हॅण्डग्लोज हुंगला. वासावरुन गुगलने पोलीस कोंडे यांना घेऊन चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. गुगल इंदिरा गांधी वसाहती क्रमांक एक झोपडपट्टीतील एका घरात घुसला. तो एका संशयिताच्या जवळ जाऊन थांबला आणि भुकू लागला. पोलिसांना संशय आल्याने संशयिताला पोलिसांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अनिल कोंडीराम काळे सांगितले. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशी तो सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे करत आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस डॉग हॅण्डलर गणेश कोंडे, अरुण चव्हाण, बी. पी. मोरे, चालक सुधीर देसाई यांनी केली.

दोन्ही ओळख परेडमध्ये एकावरच भुंकला

चार पोलीस व संशयित अनिल काळे मोकळ्या जागेत उभे राहिले. पोलिसांनी त्यास ओळख परेड घेणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यास पाचपैकी कोणत्याही जागेवर उभे राहण्यास सांगितले असता तो चौथ्या क्रमांकावर उभा राहिला. तेंव्हा गुगल वास घेत काळेच्या अंगावर भुकू लागला. खात्रीसाठी पोलिसांनी पुन्हा ओळख परेड घेतली असता गुगल पुन्हा काळेवर भुंकला.

First Published on: September 22, 2020 3:32 PM
Exit mobile version