गरज असेल तर रात्री शेती करा, महावितरणचा उद्धट सल्ला!

गरज असेल तर रात्री शेती करा, महावितरणचा उद्धट सल्ला!

नाशिक नकाशा

‘शिवारात थंडीने कहर केला आहे. शिवाय बिबट्याची दहशत असल्याने शेतकर्‍यांना दिवसा वीजपुरवठा करावा. आपला देश कृषिप्रधान आहे ना! मग शेतकर्‍यावरच एवढा अन्याय का? सरकारी अधिकारी रात्री काम करतील का? ऊर्जामंत्री बावनकुळेसाहेब शेतकरी नाहीत का?’ अशी कळवळून व्यथा मांडणार्‍या शेतकर्‍याला महावितरणचे मुंबई कार्यालयातील कार्यकारी अधिकारी आढळ यांनी ‘तुम्हाला गरज असेल तर तुम्ही शेतीसाठी रात्री पाणी भरा’ असा उद्धट सल्ला दिला. अधिकार्‍याच्या शेरेबाजीने शेतकरी संतप्त आहेत.

अधिकाऱ्यांचे कानावर हात

नाशिक तालुक्यातील मोहगाव येथील योगेश टिळे मागील महिनाभरापासून लोडशेडींगच्या विस्कळीत नियोजनाने त्रस्त झाले होते. त्यांची शेती दुष्काळ आणि थंडीच्या कचाट्यात सापडली आहे. त्यातच लोडशेडींगमध्ये रात्री सायंकाळी ६:२० ला लाईट येते आणि सकाळी ८:२० ला जाते.  असे शेड्यूल असल्याने काम करावे कधी, शेताला पाणी भरावे कधी, हा प्रश्न टिळे यांना पडला आहे. त्यातच परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ऐन बहरातील द्राक्षे, गहू अन उसाला सिंचन कसे करावे? या चिंतेने त्यांना हैराण केले आहे. परिसरातील सामनगाव उपकेंद्रांत कनिष्ठ अभियंता कसबे, नाशिकरोड येथील कार्यकारी अभियंता चौरे यांच्याकडे अनेकदा हेलपाटे मारले. मात्र त्यांनी ‘आम्ही काही करु शकत नाही!’ असं म्हणत कानावर हात ठेवले.

अधिकारी म्हणतात ‘हा राज्याचा विषय’

मरणाची थंडी आणि विस्कळीत भारनियमनामुळे पिके जगवणे मुश्किल झाले असताना अस्वस्थ झालेल्या योगेश टिळे यांनी ‘महावितरण’च्या मुंबईतील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील कार्यकारी अभियंता आढळ यांना मोबाईलवरून व्यथा मांडली. दरम्यान आढळ यांनीही ‘हा संपूर्ण राज्याचाच विषय आहे, असे सांगत असमर्थता दाखविली. यामुळे संतप्त झालेल्या टिळे यांनी ‘तुम्ही शेतकर्‍यांवर अन्याय का करता? तुम्हाला दिवसांऐवजी रात्री काम करायला सांगितले तर चालेल काय, असा प्रतिसवाल केला. यावर ’ज्यांना गरज असेल तो रात्री भरेल. तुम्हाला गरज असेल तर आहे त्या श्येड्यूलमध्ये रात्रीचं पाणी भरा!’ असं उत्तर दिल्याने टिळेंचा संताप अनावर झाला. त्याचवेळी आढळ यांनी फोन कट केला. आधीच शेतकरी संकटात असताना महावितरणच्या अधिकार्‍याने आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. असे शेतकरी योगेश टिळे यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.
First Published on: January 11, 2019 10:42 PM
Exit mobile version