अचूक भविष्य सांगा अन् २१ लाखांचे बक्षीस मिळवा

लोकसभा निवडणुक निकालांचे अचूक भविष्य वर्तवणार्‍या ज्योतिष्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे २१ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यात सहभागी असणार्‍या कार्यकर्त्यांनी संकलित केलेल्या निधीतून हे बक्षीस दिले जाईल. हे आव्हान स्वीकारण्यासाठी ज्योतिषांनी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सोमवारी १ एप्रिलला येथील हुतात्मा स्मारकात झालेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी समितीचे कार्यवाह डॉ. नितीन शिंदे, ज्योतिष अभ्यासक प्रकाश घटपांडे, कृष्णा चांदगुडे आदी उपस्थित होते.

ज्योतिष व्यवसायात आर्थिक देवाण घेवाण होताना अधिकृत पावतीसह व्यवहार होत नाही. या व्यवसायाला ग्राहक कायद्याच्या कक्षेत आणावे. तसे झाल्यास ज्योतिष अथवा भविष्य खोटे ठरल्यास त्या विरोधात न्यायालयीन दाद मागता येईल, असेही अविनाश पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्योतिषाचा फोलपणा सातत्याने मांडत आली आहे. फलज्योतिष शास्त्र आहे असा दावा करणार्‍या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले आहे. काही वेळा आव्हान स्वीकारायचा दावा करून वाद संवाद झाला. प्रत्यक्षात आव्हान प्रक्रिया सिद्ध झाली नाही. त्याचप्रमाणे मागील लोकसभा निवडणुकांच्या आधी २८ फेब्रुवारी २०१४ या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र ‘अंनिस’ तर्फे देशभरातील ज्योतिषांना लोकसभा निवडणूक २०१४ च्या निवडणुकीसंदर्भात भविष्य वर्तवावे व ते निवडणुकांच्या निकालांचे अचूक भविष्य वर्तवणार्‍या ज्योतिष्यांसाठी २१ लाख रुपयांचे बक्षिस जिंकण्याची संधी यापूर्वीही अंनिसने दिली होती. त्याच धर्तीवर लवकरच होणार्‍या लोकसभा निवडणुकीचे भविष्य ज्योतिष्यांनी वर्तवावे, असे आव्हान अंनिसतर्फे देण्यात येत आहे.
या आव्हान प्रक्रियेचे तपशील व वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच ज्योतिष संस्था व व्यक्तिंना पाठवले जाणार आहे.

..३० एप्रिलपर्यंत प्रवेशिकाच आली नाही

वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक ज्योतिषांना २१ लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. उमेदवारांसंबंधित ३० प्रश्न विचारावेत व त्यानुसार भविष्य सांगावेत, असे आवाहन केले होते. किमान २२ प्रश्नांची बरोबर उत्तरे मिळणे अपेक्षित होते. १५ एप्रिलपर्यंतची मुदत एक महिना आधीच जाहीर दिली होती. मुदतीत प्रवेशिका न आल्याने मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, तोपर्यंत एकही प्रवेशिका आली नसल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले.

First Published on: April 1, 2019 9:25 PM
Exit mobile version