सत्तेसाठी हेवीवेट नेत्यांकडून चाचपणी

सत्तेसाठी हेवीवेट नेत्यांकडून चाचपणी

राकेश बोरा

लासलगाव :दीडहजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागल्याने बाजार समिती आपल्याकडे रहावी म्हणून सगळेच नेते कामाला लागले आहे. सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात असाव्या यासाठी राज्याचे हेविवेट नेते पालकमंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार अनिल कदम, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्याकडून चाचपणी सुरू आहे. तर भुजबळ यांना चेकमेट करण्यासाठी अभि नही तो कभी नही म्हणत आमदार दिलीप बनकर, माजी जि.प. अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, जि.प. सदस्य डी. के. जगताप, बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, नामकोचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा, राजेंद्र डोखळे एकत्र येत निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. बाजार समिती निवडणूक बैठकांनी जोर धरलेला असतांना माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मात्र आपले पत्ते न उघडल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीने बाजी असे बेरजेचे राजकारण मात्र जोरात वाहू लागले आहे.

राज्याप्रमाणे जर महाविकास आघाडी होऊन बाजार समिती निवडणूक लढवली गेली तर भुजबळ यांच्या नेतृत्वाला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे आव्हान देणार का? दुसरीकडे गेल्या ग्रामपालिका निवडणुकीत विळ्या भोपळ्यासारखे लढलेले नाफेडचे संचालक भाजपा नेते नानासाहेब पाटील आणि भाजपाचे जि. प. सदस्य डी. के. जगताप बाजार समितीत एकत्र येतील का? हे पाहणे औचित्याचे ठरेल.

लासलगावच्या इतिहासात ग्रामपंचायत निवडणुकीत कट्टर विरोधक असलेले मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आणि नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी मनोमिलन करत माजी आमदार कल्याणराव पाटील, डी. के. नाना जगताप, नामकोचे उपाध्यक्ष प्रकाश दायमा यांचा करेक्ट कार्यक्रम करत ग्रामपालिकेवर आपले वर्चस्व दाखवले.त्यामुळे पुन्हा जय-विरुची हीच जोडगोळी एकत्र येत बाजार समिती आपला करिश्मा दाखवतात का? यंदा या जोडीला चितपट करण्यात विरोधकांना यश मिळते याकडे लक्ष लागलेले आहे. माजी आमदार कल्याणराव पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने त्यांचे कट्टर समर्थक माजी पं स सभापती शिवा सुरासे यांच्या धर्मपत्नी या होळकर आणि पाटील गटाकडून उभे राहणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे बापूंची भूमिका काय? याबाबत चर्चाना उधाण आलेले आहे.
जिल्ह्याचे बॉस यांनी त्यांचे अत्यंत निकटवर्तीय काका यांच्यावर लासलगाव बाजार समितीचे जबाबदारी सोपवली आहे. तर दुसरीकडे निष्ठावान म्हणून काका यांना लवकरच मोठी लॉटरी लागणार असून त्यांच्या या निवडीचे लासलगावच्या नावलौकिकात नक्कीच भर पडणार आहे.

First Published on: October 14, 2021 12:42 PM
Exit mobile version