हेल्मेटमुळे शारीरिक व्याधी,हा गैरसमजच

हेल्मेटमुळे शारीरिक व्याधी,हा गैरसमजच

helmet

हेल्मेटअभावी जीव गेला तर तो पुन्हा कसा आणणार, यावर कधीतरी हेल्मेट सक्तीला विरोध करणार्‍यांनी देखील विचार करायला हवा. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी नाशिक शहरात हेल्मेट सक्तीऐवजी आग्रह धरला आहे. शिवाय, कारवाई करताना एकाही दुचाकीचालकाकडून दंड आकारु नये, असेही आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. मात्र, शहरात हेल्मेटबाबत आजही अनेक दुचाकीचालकांचे गैरसमज आहेत. हेल्मेट सुरक्षेसाठी फायदेशीर नसून, त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात, असा गैरसमज अनेकांचा आहे. यासंदर्भात ‘आपलं महानगर’तर्फे वैद्यकीय तज्ज्ञांशी संवाद साधला असता हेल्मेटमुळे मणक्याचे विकार होतात, हा गैरसमज असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

कंटाळा केला अन् जीव गेला..

नाशिक-सिन्नर रस्त्यावर ९ सप्टेंबर रोजी सकळी नवाज जहीर खान (वय ३५, रा. दूधबाजार, जुने नाशिक) हे पळसे जवळील चौफुलीवर स्पीडब्रेकर वाचवून पुन्हा रस्त्यावर येताना त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, चालकाने पोलीस कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट सोबत ठेवले होते पण ते डोक्यात न घालता दुचाकीला अडकवल्याचे दिसून आले. यावेळी बघ्यांनी दुचाकीचालकाच्या निष्काळजीपणाबद्दल हळहळ व्यक्त केली.

आयएसआय मार्कचे असणारे हेल्मेट घ्या

रस्त्यावर विकले जाणारे हेल्मेट स्वस्त मिळते म्हणून ते कधीही घेऊ नये. रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या पदार्थाचे असू शकते. त्यामुळे अपघातात ते फुटूही शकते. आयएसआय हा लोगो भारतीय मानांकन विभागाने प्रमाणित केला आहे. असा लोगो हेल्मेटवर असावा हे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे.

विनाहेल्मेटमुळे असा होतो धोका

 

हेल्मेट हे सुरक्षेसाठी असून फायदेशीर आहे. हेल्मेटमुळे केस गळत नाही, मणक्याचे विकार होत होत नाही की डोके दुखत नाही. विद्यार्थी स्टाईलसाठी साईड मिरर नसलेल्या दुचाकी हेल्मेट घालून चालवतात. दुचाकी वेगाने चालवताना उजव्या किंवा डाव्या बाजूस पटकन पाहतात, त्यावेळी त्यांची मान किंवा पाठ लचकण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी वाहनांना साईड मिरर बसवावेत.

                                 – डॉ. शैलेंद्र पाटील, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ

First Published on: September 24, 2021 7:40 PM
Exit mobile version