नांदूरमधमेश्वर धरणातून 80 हजार क्युसेकचा उच्चांकी विसर्ग

नांदूरमधमेश्वर धरणातून 80 हजार क्युसेकचा उच्चांकी विसर्ग

नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याने दारणा, गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आल्याने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यामुळे चांदोरी, सायखेडा, शिंगवे आणि करंजगाव या गावातील नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाल्यामुळे नांदूरमधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 80 हजार क्युसेक पाण्याचा गोदावरी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे

या पावसाच्या हंगामातील 80 हजार क्यूसेक उच्चांकी पुर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून या पावसाच्या हंगामातील मंगळवार संध्याकाळपर्यंत 9 टीएमसीहुन अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली. दारणा आणि गंगापूर धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने या पुराच्या पाण्यात पानवेली मोठ्या प्रमाणात वाहून आल्यामुळे सायखेडा-सायखेडा फाटा रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलाला पानवेली अडकल्यामुळे पुराचे पाणी परिसरातील शेतांमध्ये घुसल्यामुळे शेतीचे आणि पिकाचे मोठे नुकसान झाले यावेळी पोकलँडच्या मदतीने पानवेली पूर पाण्यातच ढकलून देण्यात आल्याने आगीतून काढून फुफाट्यात टाकले या म्हणीची प्रचिती स्थानिकांना आली

गंगापूर, दारणा आणि पालखेड धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणाचे आठ वक्रकार गेट पूर्णतः उघडून देण्यात आले होते मात्र सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलाला अडकलेल्या पानवेली पाण्यात ढकलून देण्यात आल्यामुळे करंजगाव येथे गोदावरी नदीपात्रावर असलेला पुल लहान असून मोर्यमध्ये पानवेली अडकल्याने गोदावरी नदीच्या पाण्याचा फूगवटा होऊन चांदोरी, सायखेडा, करंजगाव आणि शिंगवे या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने 100 हून अधिक कुटुंबाना स्थलांतर करावे लागले. सायखेडा येथील गोदावरी नदीच्या काठावरील 200 रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले. या नागरिकांना दोन्ही वेळेस अन्न-पाण्याची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्थानिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने करण्यात आले.

First Published on: July 13, 2022 12:47 PM
Exit mobile version