तीन अभियंते, दोन वकील, एका डॉक्टरमध्ये रंगणार लढत

तीन अभियंते, दोन वकील, एका डॉक्टरमध्ये रंगणार लढत

प्रातिनिधिक फोटो

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारांघात दोन अभियंते, दोन वकील, डॉक्टर विज्ञान पदवीधर अशा उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये प्रमुख लढत रंगणार आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले परंतु, उच्च शिक्षण घेणार्‍या बहुतेक उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. इतर अपक्ष उमेदवारांनी मात्र माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केल्याचे दिसून येते. उमेदवारांच्या मालमत्तेबरोबरच त्यांचे शिक्षण हाही या निवडणुकीतील औत्सुक्याचा मुद्दा ठरला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात रिंगणात उतरलेल्या प्रमुख उमेदवारांची शैक्षणिक अर्हता लक्षात घेतल्यास त्यातील कोणीही बाजी मारली तरी मतदारसंघाला उच्चशिक्षित खासदार लाभणार असल्याचे लक्षात येते. या मतदारसंघात जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातील अपवाद वगळता सर्वच उच्चशिक्षित आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ ‘डिप्लोमा सिव्हिल’ म्हणजेच अभियंता पदविकाधारक आहेत. शेती व्यवसायिक असलेले समीर भुजबळ यांनी २००९ ते २०१४ या पंचवार्षिक काळात नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे ते पुतणे असून पंकज भुजबळांप्रमाणे समीरही छगन भुजबळांचा राजकिय वारसा पुढे चालवत आहेत. सेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हेदेखील अभियंता आहेत. स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका त्यांनी संपादीत केली आहे. दीड दशके बांधकाम व्यवसायात गुंतलेले गोडसे नंतर सामाजिक व राजकीय क्षेत्राकडे वळले. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मनसेचे ते पहिले जिल्हा परिषद सदस्य ठरले. २००९ मध्ये मनसेच्या तिकीटावर ते लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची अखेपर्यंत दमछाक करून तुल्यबळ लढत देणारे गोडसे एकदम प्रकाशझोतात आले. लोकसभेत पराभव झाल्यावर त्यांनी महापालिकेची वाट धरली आणि नगरसेवक बनले.

मनसेतून शिवसेना असा प्रवास करणारे गोडसे यांनी पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य म्हणूनही काम केले आहे. अपक्ष उमेदवारांपैकी सुधीर देशमुख हे अभियंते तसेच एमबीए पदवी प्राप्त आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तीन अभियंते निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे अपक्ष अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनीही या लोकसभा निवडणूकीत दंड थोपटले आहेत. शिक्षणाने वकील असलेले कोकाटे हे माजी आमदार असून सहकार क्षेत्रात त्यांनी विविध पदे भुषविली आहेत. नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. सध्या ते जिल्हा बँकेचे संचालक आहेत. सिन्नरचे माजी आमदार असलेले कोकाटे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणारे कोकाटे यांचा सेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी त्यांचा पराभव केला. तर वैभव आहिरे हेदेखील वकील आहेत.

दिंडोरीत डॉक्टर, पदवीधारकांमध्ये लढत

दिंडोरीचे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार या एमबीबीएस आहेत. वैद्यकिय क्षेत्रातील जरी असल्या तरी त्यांनी याला राजकारणाची जोड दिली आहे. जिल्हा परिषद सदस्य असलेल्या डॉक्टर पवार या जिल्हा परिषद सदस्या असून यापूर्वी दोन वेळा त्यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवली आहे. तर आमदार जीवा पांडू गावित हे विज्ञान पदवीधारक असून या मतदारसंघातून ते ७ वेळा विधानसभा निवडणूकीत विजयी झाले आहेत. आदिवासींचे नेते म्हणून ओळख असलेल्या गावितांनी आदिवासींच्या हक्कासाठी नाशिक ते मुंबई पायी मोर्चाही काढला होता या मोर्चाची सरकारला दखल घ्यावी लागली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले हे शेतकरी कुटुंबातील असून दिवंगत खासदार हरिभाउ महाले यांचे ते पुत्र आहेत. महाले यांनी या मतदारसंघातून तीवेळा लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. त्यामुळे घरातूनच राजकारणाचा वारसा लाभलेले धनराज महाले यांनी यापूर्वी २००९ च्या विधानसभा निवडणूकीत ते आमदार म्हणून विजयी झाले. जिल्हा परिषद सदस्य असलेले महाले यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

First Published on: April 13, 2019 11:45 PM
Exit mobile version