सुकेण्यातील पोळा जत्रेला ऐतिहासिक घटनेची किनार

सुकेण्यातील पोळा जत्रेला ऐतिहासिक घटनेची किनार

शेतीत वर्षभर राबणारा शेतकर्‍याचा मित्र असलेल्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा म्हणजे पिठोर अमावस्या अर्थात बैलपोळा. या दिवशी गावोंगावी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली जाते. प्रत्येक गावातील मिरवणूक जशी वैशिष्ठ्यपूर्ण असते, तशीच निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे या गावातील मिरवणुकदेखील लक्षवेधी ठरली आहे.येथील बैलपोळ्यातील मानाच्या बैलजोडीला तब्बल दीडशे वर्षांची परंपरा आहे. बिटिशांना केलेल्या मदतीतून त्यांच्याकडून बैलपोळा मिरवणुकीत मान मिळवून घेणार्‍या मुक्ताबाईच्या कर्तृत्त्वाचीही ती परंपरा असल्याचे मानले जाते.

दीडशे वर्षांपूर्वी ब्रिटीशांच्या काळात १८५७ मध्ये घडलेल्या एका घटनेतून या प्रथेला सुरुवात झाली. त्या काळात निफाड भागात पाणी पोहोचण्याचे माध्यम केवळ बाणगंगा नदी होती. बाणगंगा नदीचे पाणी दीक्षी गावापर्यंतच पोहोचायचे. सुकेण्यापर्यंत पाणी पोहोचत नव्हते. अशातच सुकेण्यातील रहिवासी मुक्ताबाई पतीसोबत सर्जा-राजा या आपल्या बैलजोडीला घेऊन दीक्षीकडून सुकेण्याकडे निघाल्या होत्या. त्यावेळी दीक्षी गावात पोहोचताच येथे बंधारा बांधून आपल्या गावाकडे पाणी घेऊन जाता असे त्यांच्या लक्षात आले.

पाणी आल्यास गावातील शेती सुधारेल, अनेक कुटुंब सधन होतील, हा त्यामागील विचार होता. कारण, त्यावेळी चौफेर माळरान आणि त्यावर मोळथुंबी लोहाळा गवत होते. याच गवताचा अत्यंत कुशलतेने त्यांनी पाणी वळवण्यासाठी वापर केला. दीक्षीपासून उतार लक्षात घेत त्यांनी गवताच्या गाठी बांधत सुकेण्यापर्यंत नेल्या. अशा रितीने सर्व्हे झाल्यानंतर दीक्षीपासून स्वतः आपल्या सर्जा-राजासोबत नांगर घेऊन त्या निघाल्या. यात त्यांना त्यांच्या पतीचाही खंबीर पाठिंबा लाभला. केवळ पाठबळच नव्हे तर त्यांनी मुक्ताबाईंसोबत या कार्यात झोकून दिले. मुक्ताबाई बैलजोडी हाकत अन् मागे नांगर धरून ते मदत करत असत. त्यांनी दीक्षी ते सुकेणा मार्गावर एकूण ७ किमीचा चर खोदला आणि पाणी येण्यासाठीचा चर तयार केला.

ब्रिटीश अधिकार्‍यार्ंंपर्यंत ही गोष्ट पोहोचताच त्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करत भविष्याच्या दृष्टीने दीक्षी येथे पक्का बंधारा बांधून मुक्ताबाई शेवकर यांनी तयार केलेल्या चराच्या बाजूनेच सुकेण्यापर्यंत पक्का चर (आताच्या भाषेत पाट) नेला आणि आजही हा चर आपल्याला या इतिहासाची या आठवण करून देतो आहे.

ब्रिटिश अधिकार्‍यांनी त्यावेळी मुक्ताबाई आणि तिच्या पतीचा सत्कार करताना त्यांना पाचशे एकर जमीन आणि दोन लाख पाउंड देण्याचे ठरविले; मात्र, मुक्ताबाईंनी नम्रपणे नकार देत हे काम माझ्या सर्जा-राजाने केल्याचे सांगत त्यांच्यासाठी मी मागेल ते मला मिळावे, अशी अट घातली.

ब्रिटिश अधिकार्‍यांनाही मुक्ताबाईंच्या या उदार स्वभावाचे अप्रूप वाटले आणि त्यांना अट मानण्याची तयारी दर्शवली. दरवर्षी पोळ्याला माझ्या सर्जा-राजाने सर्वप्रथम वेस ओलांडावी आणि त्यानंतर गावातील इतर बैलजोड्या जातील, अशी अट ऐकताच ब्रिटीशांनी गावातील पंचांशी चर्चा करत होकार दिला.

तेव्हापासून ते आजपर्यंत सुकेणे गावात शेवकर कुटुंबाचे सर्जा-राजा सर्वप्रथम वेस ओलांडतात आणि त्यानंतर गावातील इतर बैलजोड्या सहभागी होतात. मुक्ताबाईंनंतर शेवकर कुटुंबाच्या चार पिढ्या आणि १६ कुटुंब झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी हा मान रोटेशन पद्धतीने होत असल्याने एकदा मान मिळाल्यानंतर त्या कुटुंबाला ९ वर्षांनी पुन्हा मान मिळतो.

प्रथा जोपासताना आनंद

पूर्वजांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज आमच्या गावात पाणी आले आहे. तेव्हापासून असलेली प्रथा जोपासताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही प्रथा पुढेही जोपासत राहू. – सुरेश शेवकर, सुकेणे

First Published on: August 29, 2019 11:53 PM
Exit mobile version